Pune Ganeshotsav: पुण्यात पारंपरिक गणेशोत्सवाची चर्चा संबंध महाराष्ट्रात असते. एकाबाजूला डीजे, लाऊडस्पीकरचा ठणठणाट वाढत असताना पुण्यात ढोल-ताशाच्या गजरात गणेश आगमन आणि विसर्जन पार पडत असते. यंदा गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वेगळा प्रयोग करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पावरी नृत्य सादर केले. पण या कलेसाठी पुणेकरांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आदिवाशी नृत्य सादर करणाऱ्या पथकाचा हिरमोड झाला असल्याची प्रतिक्रिया मुकुंद पाडवी यांनी दिली आहे. मुकुंद पाडवी यांच्या नेतृत्वाखाली २२ जणांच्या चमूने पुण्यात हे नृत्य सादर केले होते.
यंदा पुण्यात महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी बांधवाना पुण्यात बोलावले गेले आहे. आदिवासी समुदायाच्या कलेला वाव देण्यासाठी २०१७ पासून गणेशोत्सवादरम्यान त्यांची कला सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला जात आहे. एकूण १२० विविध जमातींना पुण्यात निमंत्रित केले गेले आहे, मुकुंद पाडवी हे त्यापैकीच एक आहेत.
मुकुंद पाडवी यांच्या पावरी नृत्यासाठी अद्याप दोनच मंडळांनी नोंदणी केली आहे. गणेश आगमनाचे पहिले दोन दिवस आणि शेवटच्या दिवसासाठी एक बुकिंग मिळाली आहे. “नृत्य सादर करणारे कलाकार आता पुन्हा आपल्या गावी पोहोचले आहेत. ते थेट शेवटच्या दिवशी परत येतील. आम्ही जवळपास ३५ मंडळाशी संपर्क साधला, पण त्यांनी बजेट नसल्याचे कारण पुढे केले. ज्या लोकांनी आदिवासी नृत्यासाठी रस दाखविला, त्यांनी आमच्याकडे डिस्काऊंटची मागणी केली. आमचे एवढेच म्हणणे आहे की, कलाकारांना जो आदर मिळायला हवा, तो दिला गेला पाहिजे. त्यांच्या कलेची किंमत करू नये”, अशी खंत मुकुंद पाडवी यांनी व्यक्त केली.
रजत रघतवन यांनी २०१७ साली युनिव्हर्सल ट्राइब्स या संस्थेची स्थापना करून भारतातील आदिवासी जमातीच्या सबलीकरणाची सुरुवात केली. त्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, २०१९ साली आम्हाला पुण्यात एका पथकाने कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले. यावर्षी आदर्श मित्र मंडळाचे उपाध्यक्ष उदय जगताप यांच्या साथीने रतज रघतवन हे धनकवडी येथील ११ मंडळासह काम करणार आहेत.
हे ही वाचा >> Pune Video : पुण्यात गणपती बघायला जाताय? मग हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
उदय जगताप म्हणाले की, आम्ही आदिवासी जमातींना राज्याच्या विविध भागांतून आमंत्रित करत आहोत. जेणेकरून शहरातल्या लोकांनाही त्यांच्या संस्कृतीचे दर्शन होईल. तसेच या कलाकारांनाही रोजगाराचे साधन मिळेल. सध्या गणेश मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषण होत असून लोकांनाही त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आदिवासी कला सादर करण्याचा एक उत्तम पर्याय मंडळासमोर आहे.