पिंपरी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तीन लाख घरांवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या शहरवासियांना मोफत ध्वज वाटप करण्यात येणार आहे. शहरवासीयांसह शैक्षणिक, सामाजिक संस्था, सोसायट्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत देश पातळीवर महापालिकेचा ठसा उमटविण्यासाठी शहरातील ३ लाख घरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. पालिका मुख्यालयात विभाग प्रमुख व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते.

याविषयी बोलताना आयुक्त म्हणाले, पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ध्वज वितरण केंद्र तयार करण्यात आले आहे. नागरिकांसाठी अल्प किमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात येणार आहेत. ध्वज खरेदी करून नागरिकांनी आपआपल्या घरावर अथवा इमारतीवर फडकवायचा आहे. विशेष व्यक्तींच्या हस्ते शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालय, विरंगुळा केंद्र, रुग्णालये, चित्रपट गृह अशा ७५ ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ११ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘प्लॉगेथॉन’ घेण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. शाळा, महाविद्यालये, विरंगुळा केंद्र, पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, सोसायटी, सामाजिक व राजकीय संघटनांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tricolor will fly 3 lakh houses pimpri occasion amrit mahotsav independence pune print news ysh
First published on: 02-08-2022 at 17:52 IST