पुणे : ‘सध्या विचार करण्यावरच निर्बंध आहेत. विचार करू नका, काही तरी घंटा वाजवा, मध्यरात्रीपर्यंत ढोल बडवा, असेच प्रकार सुरू आहेत. आमच्या कानाला होणाऱ्या त्रासाची चिंता नसते. मात्र, तुमच्या कानाला त्रास व्हायला लागले, की ढोल बंद करायचे, अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे,’ अशी खंत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केली.
भरत नाट्य मंदिर संशोधन मंदिराच्या १३१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘भरत करंडक एकांकिका स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण समारंभात पेठे बोलत होते. ‘नेत्यांच्या भाषणांत जाहीरपणे शिवीगाळ केली जाते. कणकवलीचे आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलतात, हे तपासून बघायला हवे,’ अशी टीकाही त्यांनी केली.
ज्येष्ठ सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, अभय जबडे, भाग्यश्री देसाई या वेळी उपस्थित होते. चिन्मय कटके, स्वानंद नेने, रावी पागे, दीपकराज दंडवते, प्रियांका गोगटे, राजन कुलकर्णी या कलाकारांना, भालचंद्र कुलकर्णी, रवींद्र खरे यांना नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी, तर नेमिनाथ मरसुते यांना ‘रसिक सन्मान’ आणि विश्वास पांगारकर यांना ‘कार्यसन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, रेणू गावस्कर यांच्या एकलव्य न्यास संस्थेला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
पेठे म्हणाले, ‘राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० पुस्तकांची दुकाने नाहीत, वाचनालये नाहीत. शाळांची, रुग्णालयांची अवस्था भीषण आहे. आता ‘जेन झी’ मुले काही तरी वेगळे सांगतात, वेगळे बघत असतात. त्यांची पिढी वेगळे काही तरी करत आहे. त्याची जाण आपल्याला नाही. आपल्यात तो दृष्टिकोनच विकसित झालेला नाही. संपूर्ण समाज हा उद्या निवडणूक आहे, अशा पद्धतीने वागत असतो.’
‘मराठवाड्यासारख्या ठिकाणी पावसाचा कहर झाला, लोकांचे हाल झाले. ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही. माणसाने केलेल्या उन्मादाचे हे फळ आहे. आता परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी दृष्टिकोन बदलावा लागेल. नाटकवाल्यांवर ही मोठी जबाबदारी आली आहे. समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम करायला हवे. त्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नाटककाराला असणे गरजेचे आहे. त्याने प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून नवे प्रयोग करायला हवेत. त्यामुळे नाटकवाल्यांनी शस्त्राचे पूजन न करता शब्दाचे पूजन केले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, भरत नाट्य संशोधन मंदिराच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजारांचा निधी देणार असल्याचे विजयकांत कुलकर्णी यांनी जाहीर केले. क्रिकेटच्या खेळामध्ये जे झाले ती परिस्थिती नाट्य क्षेत्रात यायला नको. त्यामुळे ज्यांना पुरस्कार मिळतील आणि ज्यांना पुरस्कार मिळणार नाहीत, त्यांनी आनंदाने एकमेकांशी हस्तांदोलन करा. – अतुल पेठे, ज्येष्ठ रंगकर्मी