प्रश्नपत्रिका नष्ट झाल्याचा परिणाम; वेळापत्रकात अंशत: बदल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकातील ५ मार्च आणि ७ मार्चला होणाऱ्या परीक्षा आता अनुक्रमे ५ एप्रिल आणि ७ एप्रिलला घेतल्या जातील.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळाने ४ ते ३० मार्च दरम्यान बारावीची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनाही देण्यात आले आहे. मात्र संगमनेरजवळ बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लागल्याने त्यात प्रश्नपत्रिका नष्ट झाल्या आहेत. ५ मार्च आणि ७ मार्चला विविध भाषा विषयांच्या परीक्षा होणार होत्या. या दोन दिवसांच्या परीक्षा वगळता अन्य परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दहावीच्या परीक्षाही वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
होणार काय? बारावीच्या सर्वसाधारण, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकातील ५ मार्चला होणाऱ्या परीक्षा आता ५ एप्रिलला आणि ७ मार्चला होणाऱ्या परीक्षा ७ एप्रिलला होणार आहेत.
प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लागल्याने पंचवीस विषयांच्या प्रश्नपत्रिका त्यात नष्ट झाल्या. त्यामुळे आता राज्यभरासाठीच नव्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतील. त्याच्या छपाई आणि तांत्रिक कामांसाठी काही वेळ आवश्यक असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. – शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ