पुणे : शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना चोरट्यांनी चक्क घरासमोर लावलेला बारा चाकी ट्रकच पळवून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरूद्ध वाघोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ट्रक मालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दार हे व्यावसायिक आहेत. ते वाघोलीतील विठ्ठलवाडी भागात राहायला आहेत. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी घरासमोर बारा चाकी ट्रक लावला होता. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून बारा चाकी ट्रक चोरून नेल्याची घटना बुधवारी (१ ऑक्टोबर) मध्यरा‍त्री घडली.

सकाळी नेहमीप्रमाणे तक्रार दार व्यावसायिक घरासमोर आले. तेव्हा घरासमोर लावलेला ट्रक जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या ट्रक चोरट्याचा माग काढण्यात येत असून, पोलीसांनी तक्रारदार व्यावसायिकाचे घर आणि नगर रस्ता भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चारचाकी वाहनांच्या तुलनेत शहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जातात.