पुणे : मार्केट यार्डातील फळ बाजारात दोन ते अडीच किलो वजनाच्या दीडशे किलो आंब्याची आवक झाली. कर्नाटकातून आंब्याची आवक झाली असून, एक किलो आंब्याला ६० ते ७० रुपये दर मिळाले आहेत.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील डी. बी. उरसळ अँड सन्स या पेढीवर कर्नाटकातील शेतकऱ्यांनी खुददाद आंबा विक्रीस पाठविला. मोठा आकार, तसेच वजनाच्या या आंब्यांना कर्नाटकात खुददाद आंबा म्हणून ओळखले जाते. या आंब्याची कोय आकाराने लहान असून, गर जास्त प्रमाणात आहे. मंगळवारी वीस ते तीस किलो वजनाच्या पाच प्लास्टिक जाळीतून खुदादाद आंब्यांची आवक झाली. लष्कर भागातील किरकोळ विक्रेत्यांनी या आंब्याची खरेदी केली, अशी माहिती कर्नाटक आंब्यांचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
यंदा कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला आहे. कर्नाटकातील आंब्याांची आवक वाढली आहे. कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम साधारणपणे १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. डिसेंबर, जानेवारीत कर्नाटकातील आंब्यांना चांगला मोहोर आला होता. हवामान बदलामुळे मोहोर गळाला. त्यामुळे कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम उशिराने सुरू झाला. कर्नाटकातून पायरी, लालबाग, बदाम या आंब्यांची आवक वाढली आहे, असे उरसळ यांनी सांगितले.