पुण्यातील जुन्या सांगवीतील वेताळ महाराज वसाहतीत काल (शनिवारी) रात्री एका टोळक्याने धुडगूस घातला. रात्री पावणे दहाच्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत कोयत्याने आणि लाकडी दांड्याने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. या टोळक्याने पाच दुचाकी तर पाच चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामधील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री पावणे दहाच्या सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या मुलांनी वेताळ महाराज वसाहतीत राहणाऱ्या एका तरुणाला दुचाकीने कट मारला. त्यामुळे या तरुणाने चिडून त्यांना हटकले. त्यानंतर दुचाकीवरील मुलांनी तरुणाला दमदाटी करत, मी कोण आहे तुला माहित आहे का?, असे म्हणत १० ते १२ साथीदारांना आणले आणि तरुणाला मारहाण केली.
तरुणाला मारहाण केल्यानंतर १० ते १२ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालत ३ कोयते आणि २ लाकडी दांडक्यांनी परिसरातील चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यातील एक जण अल्पवयीन आहे. सांगवी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.