बिबवेवाडी भागात पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. आकाश उद्धव कोपनर (वय २१, मूळ रा. अहमदनगर), सनी विनोद मेहरा (वय २६, रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा- साखर उत्पादनात मोठी तूट, सुधारित अंदाज ३३० लाख टनांचा; लवकरच भाववाढीची शक्यता
कोपनर, मेहरा हे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर भागात राहायला आहेत. दोघेजण दुचाकीवरुन मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम आले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अतुल महांगडे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. दोघे जण एकावर गोळीबार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. कोपनर याच्या विरोधात दौंड आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, रवींद्र राऊत, संतोष जाधव, शिवाजी येवले, प्रणय पाटील आदींनी ही कारवाई केली.