पुणे : इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत सोमवारी संपुष्टात आली. या फेरीत प्रवेश जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६८ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला असून, २ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. आतापर्यंत केंद्रीभूत फेरी आणि राखीव जागांवरील प्रवेश मिळून एकूण ५ लाख ८ हजार ६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने २८ जून रोजी पहिल्या फेरीची निवडयादी जाहीर केली. त्यानुसार राज्यात ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. सोमवारी रात्रीपर्यंत ४ लाख ३२ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे २ लाख विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीतील प्रवेशाकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात पुणे विभागाअंतर्गत १ लाख १६ हजार २९१ जागांसाठी प्रवेश जाहीर करण्यात आला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४५ हजार ५०५, सोलापूर जिल्ह्यात २० हजार ६३१ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २४ हजार ६८७ अशा एकूण ९० हजार ८२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागाअंतर्गत २६ हजारांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात ९ हजार ४६९ महाविद्यालयांमध्ये १६ लाख ७० हजार ५९८ जागा कॅप प्रवेशाच्या तसेच ४ लाख ५३ हजार १२२ जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण २१ लाख २३ हजार ७२० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी १३ लाख ८३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ४ लाख ३२ हजार १८७ विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश फेरीत, तसेच ७५ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी विविध कोटाअंतर्गत अशा एकूण ५ लाख हजार ८०९ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी कॅप प्रवेशाच्या १२ लाख ३८ हजार ४११ आणि कोटा प्रवेशाच्या ३ लाख ७७ हजार ३२० अशा एकूण १६ लाख १५ हजार ७३१ जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार १० ते १३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करणे, पसंतीक्रम नोंदवता येणार आहे. दुसऱ्या फेरीची निवडयादी १७ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.