पुणे : एटीमधून पैसे काढणाऱ्या दोघांची चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत एक लाख रुपयांची फसवणूक केली. खडकी बाजार, तसेच येरवडा भागात या घटना घडल्या. येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात एका बँकेच्या एटीएमधून पैसे काढणाऱ्या तरुणाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्याच्या खात्यातून ४० हजारांची रोकड लांबविली. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण येरवड्यातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्या वेळी दोन चोरटे एटीएममध्ये शिरले. तरुणाकडे मदतीचा बहाणा केले. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी केली. त्याच्याकडील सांकेतिक शब्द आणि डेबीट कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्यांनी पैसे काढण्याचा बहाणा केला.
चोरट्यांनी त्यांच्याकडील डेबिट कार्ड तरुणाला दिले. एटीएममधून पैसे बाहेर न आल्याने तक्रारदार तरुण तेथून निघून गेला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या डेबिट कार्डचा गैरवापर करुन त्याच्या खात्यातून ४० हजारांची रोकड चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.
खडकी बाजार परिसरात एटीएमधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून चोरट्यांनी ६० हजारांची रोकड लांबविल्याची घटना शुक्रवारी (११ जुलै) दुपारी घडली. याबाबत ज्येष्ठाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे शुक्रवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास खडकी बाजार परिसरातील एका बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी चोरट्यांनी मदतीचा बहाणा करुन ज्येष्टाकडील डेबिट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. चोरट्यांनी त्यांच्याकडील डेबिट कार्ड त्यांना दिले. चोरलेल्या डेबिट कार्डचा वापर करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे तपास करत आहेत.
पोलिसांचे आवाहन
शहरातील बहुतांश बँकाँच्या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी बँकांच्या एटीएमच्या परिसरात सुरक्षारक्षक ठेवले जायचे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर एटीएमच्या बाहेर तैनात असलेले सुरक्षारक्षक कमी करण्याचा निर्णय विविध बँकांमधील व्यवस्थापनाने घेतला. सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरटे ज्येष्ठ नागरिकांकडे मदतीचा बहाणा करुन त्यांच्याकडील रोकड लांबवून चोरटे पसार होतात एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांवर पाळत ठेवून चोरटे त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे ज्येष्ठांनी एटीएमच्या परिसरात घुटमळणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवावी. शक्यतो त्रयस्थ व्यक्तीच्या मदतीच्या भानगडीत पडू नका. बतावणी करणारा चोरटा एटीएमच्या परिसरात आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.