पुणे : खून प्रकरणातील आरोपी असलेल्या सराइतांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. या प्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे), राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदम गल्ली) यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी विविध कार्यक्रमांनिमित्त शहरात आले होते. त्या वेळी गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा दुसरे पिस्तूल साथीदार राहुल याच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, चेतन शिरोळकर, अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर आणि पथकाने ही कामगिरी केली. आरोपींनी पिस्तूल का बाळगले ? तसेच त्यांनी पिस्तूल कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
ज्ञानेश्वर पादुका चौकात एकाला पकडले
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवाजीनगर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी अभिषेक हा ज्ञानेश्वर पादुका चौकात थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
परिमंडळ एकचे पोलीस उपायुकत ऋषिकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव, दीपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी ही कामगिरी केली.