पुणे : शहरात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे श्वान नागरिकांना चावण्याच्या घटनाही वाढत आहेत. अशी परिस्थिती असतानाही महापालिकेची दोन श्वान नसबंदी केंद्रे तीन महिन्यांपासून बंद असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्याबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महापालिकेची शहरात श्वान नसबंदी केंद्रे आहेत. येथे श्वानांची नसबंदी आणि त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाते. स्वयंसेवी संस्थांकडून ही केंद्रे चालविली जातात. ही केंद्रे मुंढवा, बाणेर, नायडू रुग्णालय, ब्ल्यू क्रॉस, कात्रज, होळकरवाडी आणि वडकी येथे आहेत. यातील बाणेर आणि नायडू रुग्णालय ही दोन केंद्रे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. बाणेर केंद्रातील शस्त्रक्रिया कक्षात विजेचा धक्का बसत होता. त्यामुळे ते बंद करण्यात आले होते. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विद्युत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर गुरुवारी विद्युत विभागाने बाणेर केंद्रातील दुरुस्ती पूर्ण केली. नायडू रुग्णालय केंद्र हे रस्त्याच्या कामामुळे बंद आहे. याबाबत आरोग्य विभागाने पथ विभागाला पत्र पाठवून लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

शहरातील भटक्या श्वानांची गणना महापालिकेने मे २०२३ मध्ये केली होती. त्यानुसार शहरातील श्वानांची संख्या २०१८ मध्ये ३ लाख १५ हजार होती, ती २०२३ मध्ये १ लाख ७९ हजारांवर आली. मात्र, महापालिकेत ३४ गावे समाविष्ट झाल्यानंतर भटक्या श्वानांच्या संख्येत आणखी वाढ झाली. महापालिकेच्या हद्दीत सध्या सुमारे अडीच ते पावणेतीन लाख भटके श्वान असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. समाविष्ट गावांतील भटक्या श्वानांची नसबंदी आधी करण्यात न आल्याने आरोग्य विभागाकडून नसबंदीचा वेग वाढविला जाणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तीन महिन्यांपासून दोन श्वान नसबंदी केंद्रे बंद आहेत. त्यामुळे शहरात श्वानांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरातील सातपैकी दोन श्वान नसबंदी केंद्रे बंद आहेत. त्यांतील एक केंद्र येत्या दोन दिवसांत सुरू होईल. दुसरे केंद्र सुरू करण्याबाबत पथ विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या इतर केंद्रांमध्ये श्वान नसबंदी जास्त करण्यावर भर देण्यात आला आहे. – डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

शहरातील एकूण श्वान

२.५ ते २.७५ लाख

श्वान चावण्याच्या घटना

जानेवारी – २७९२

फेब्रुवारी – २३०९

मार्च – २३५९

एप्रिल – २५०८

मे – २३४४

जून १८३५

जुलै – २९५७

श्वान नसबंदी व लसीकरण

एप्रिल ते जून – १४,२९७