खराडी भागात पादचारी तरुणाचा मोबाइल संच हिसकावणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. अजय दिगंबर वाघमारे (वय २७), गणेश शंकर लांडगे (वय २४, दोघे रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत राहुलकुमार राॅय (वय २५, रा. वडगाव शेरी) याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राॅय खराडी भागातील मोअर स्टोअरसमोर मोबाइलवर बोलत थांबला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल संच हिसकावून नेला. राॅयने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा- पुणे : ज्येष्ठ नागरिकाची पावणेसहा लाख रुपयांची फसवणूक

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मोअर स्टोअर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने केलेल्या चित्रीकरणात संशयित चोरटे आढळून आले. त्यानंतर वाघमारे आणि लांडगे यांना सापळा लावून पोलिसांनी पकडले. दोघांनी आणखी काही जणांचे मोबाइल हिसकावल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे तपास करत आहेत.