पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना बाणेर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन किलाे गांजा जप्त करण्यात आला. रवी विजय वर्मा (वय १९), कौशलेंद्र नथूराम वर्मा (वय २३, दोघे सध्या रा. शिव काॅलनी, पिंपळे सौदागर, मूळ रा. भरतकुंभ, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

वर्मा बाणेर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून तीन किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होते, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक डाबेराव, नंदकुमार कदम, अनिल माने, उपनिरीक्षक संदेश माने, शैला पाथरे, सहायक फौजदार सपकाळ, गायकवाड, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे यांनी ही कामगिरी केली.

गुरुवार पेठेत मेफेड्रोन बाळगणारा तरुण गजाआड

गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौकात मेफेड्रोन बाळगणाऱ्या तरुणाला खडक पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून दोन लाख २५ हजार रुपयांचे ४५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सुदीपकुमार राजेशकुमार कनोजिया (वय २२, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जैन मंदिर चौकात कनोजिया मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची महिती पोलीस कर्मचारी चव्हाण यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिसांनी सापळा लावून कनोजियाला पकडले. त्याच्याकडून मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याने मेफेड्रोन कोणाकडून आणले, तसेच तो कोणाला विक्री करणार होता यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.