लोकसत्ता प्रतिनिधी पुणे: साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. गुढीपाडव्याच्या आधीच्या पंधरवड्यात नागरिकांनी ११ हजार ९६४ वाहनांची खरेदी केली. यंदा दुचाकी विक्रीत वाढ झाली असली तर मोटारींच्या विक्रीत घट झालेली दिसून आली आहे. यंदा गुढीपाडव्याचा मुहूर्त डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील आकडेवारीनुसार ७ ते २१ मार्च या पंधरवड्यात ११ हजार ९६४ वाहनांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीपेक्षा ही संख्या सुमारे पाचशेने अधिक आहे. मागील वर्षी गुढीपाडव्याच्या आधी १९ मार्च ते २ एप्रिल या पंधरवड्यात ११ हजार ४६६ वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा दुचाकींची विक्री सर्वाधिक असून, ती ८ हजार ११ आहे. त्या खालोखाल मोटारींची विक्री २ हजार ९३३ आहे. मालवाहतुकीच्या वाहने ३८९, रिक्षा २६७, बस २१ आणि इतर वाहने २७७ अशी विक्री झाली. आणखी वाचा- पुणे: ई मेल, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये देवनागरी लिपीपासून सुरुवात मागील वर्षातील गुढीपाडव्याच्या आधीच्या पंधरवड्याच्या तुलनेत यंदा दुचाकींच्या नोंदणीत सुमारे दीड हजाराने वाढ झाली आहे. यावेळी मोटारींची नोंदणी सुमारे एक हजाराने तर मालमोटारींची नोंदणी सुमारे दीडशेने कमी झाली आहे. रिक्षांच्या नोंदणीत यावेळी पन्नासने वाढ झाली. बसच्या नोंदणीत यावेळी घट झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. संपाचा नोंदणीवर परिणाम नाही यंदा वाहन खरेदीसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. त्यामुळे वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. सरकारी कर्मचाऱ्यांनी नुकताच संप केला होता. परंतु, वाहन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने त्यावर परिणाम झाला नाही. वाहन नोंदणीची प्रक्रिया थेट वाहन वितरकांकडून केली जात असल्याने संपाचा फटका बसला नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.