Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena in Chakan Nagar parishad Election 2025 : चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे) एकत्र आल्या आहेत. चाकणमध्ये शिवसेनेकडून (शिंदे) माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्या आहेत. मनिषा गोरे यांनी रविवारी (१६ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेनेचे (उबाठा) स्थानिक आमदार बाबाजी काळे व शिवसेनेचे (शिंदे) आमदार शरद सोनावणे उपस्थित होते. तसेच यावेळी दोन्ही शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान बाबाजी काळे म्हणाले, “खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पश्चात ही येथील पहिलीच निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनिषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे मनिषा गोरे यांच्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवलं आहे. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून आम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनिषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, याला आमची युती म्हणता येणार नाही”, काळे यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली.

शिवसेनेचा (उबाठा) एकनाथ शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा

आमदार बाबाजी काळे म्हणाले, “आमच्या या कृतीला युती म्हणता येणार नाही. २०१४ साली सुरेश गोरे हे शिवसेनेचे आमदार होते. मात्र, करोना काळात त्यांचं निधन झालं. मूळ शिवसेना (उबाठा) या पक्षाचा मी २०२४ पासून आमदार आहे. मी २०२४ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा आमच्या व्यासपीठावर मनिषा गोरे यांच्यासह संपूर्ण गोरे कुटुंब उपस्थित होतं. त्यांनी माझा जाहीर प्रचार केला होता. आता मनिषा गोरे या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून आपण मनिषा गोरे यांना पाठिंबा द्यावा, त्यांना बिनविरोध निवडून आणावं असं आम्ही ठरवलं.”

“चाकण शहरात मनिषा गोरे यांना प्रचंड सहानुभूती आहे. आता दोन शिवसेना तयार झाल्या असल्या तरी सुरेश गोरे यांनी विधानसभेत केलेलं काम, त्यांचं सहकार्य विचारात घेऊन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार द्यायचा नाही असं आम्ही ठरवलं. मनिषा गोरे यांचा निवडणूक अर्ज भरताना मी, आमचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक असे सर्वजण मिळून गेलो होतो. आम्ही मनिषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही.”

शिवसेनेचे (उबाठा) आमदार बाबाजी काळे म्हणाले, “आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे की त्यांनी मनिषा गोरे यांना बिनविरोध निवडून द्यावं. निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल. मात्र, चाकण नगर परिषदेत आम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहेत. आम्ही निवडणुकीत युती केलेली नाही. केवळ नगराध्यक्षपदासाठी मनिषा गोरे यांना पाठिंबा दिला आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर आमचे उमेदवार उभे आहेत.”