पुणे : गुणवत्तापूर्ण संशोधनपत्रिकांची ‘यूजीसी केअर’ ही यादी रद्द करण्याच्या निर्णयावर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) शिक्कामोर्तब झाले आहे. संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी संशोधनपत्रिकांसाठीचे नवे गुणवत्ता निकष यूजीसीकडून जाहीर करण्यात आले असून, संशोधनपत्रिकांसाठी उच्च शिक्षण संस्थांच्या स्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देशही ‘यूजीसी’ने दिले आहेत.
‘यूजीसी’ने याबाबतचे परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. देशात बोगस संशोधनपत्रिकांचे पेव फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘यूजीसी’ने २०१९ मध्ये मान्यताप्राप्त संशोधनपत्रिकांची ‘यूजीसी केअर’ ही यादी सुरू केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार करण्यात येत असलेल्या बदलांचा भाग म्हणून ‘यूजीसी’ने ‘यूजीसी केअर’ ही यादी रद्द करण्याचा निर्णय ११ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. तसेच, संशोधनपत्रिकांसाठी नवे निकष निश्चित करण्याबाबतच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचना २५ जून रोजी झालेल्या ५९१व्या बैठकीत मान्य करून अंतिम केलेले निकष, तसेच १० फेब्रुवारी २०२५पर्यंतच्या ‘यूजीसी केअर’मधील १४७४ संशोधनपत्रिकांची यादीही संदर्भासाठी जाहीर करण्यात आली आहे.
‘यूजीसी’ने निश्चित केलेल्या अंतिम निकषांमध्ये संशोधनपत्रिकेची प्राथमिक पात्रता, संपादक मंडळाचे निकष, संपादकीय धोरणे, गुणवत्ता निकष, संशोधन नैतिकता, पोहोच, प्रभाव या निकषांचा समावेश करण्यात आला आहे. या निकषांनुसार प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन विषयाशी, अभ्यास क्षेत्राशी संबंधित संशोधनपत्रिकांची निवड करावी, तसेच, उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या स्तरावर अंतर्गत समितीची स्थापना करावी, या समितीकडून निकषांमध्ये स्थानिक गरजेनुसार, काळानुरूप बदल करता येतील, असेही ‘यूजीसी’ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, उच्च शिक्षण संस्था आणि संशोधक, अभ्यासकांच्या स्तरावर प्रामाणिकपणा, जागृती असती, तर बोगस संशोधनपत्रिकांचा प्रश्नच उद्भवला नसता. मात्र, त्याच्या अभावामुळेच ‘यूजीसी केअर’ ही यादी करण्याची वेळ आली होती. या यादीमुळे गेल्या चार-पाच वर्षांत काही प्रमाणात बोगस संशोधनपत्रिकांना चाप लागली, जागृती निर्माण झाली आहे. आता ‘यूजीसी केअर’ यादी रद्द केल्यानंतर नव्या निकषांनुसार गुणवत्तापूर्ण संशोधन, संशोधनपत्रिकांचे काय होते, हे पाहावे लागेल, असे यूजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ डॉ. भूषण पटवर्धन यांनी सांगितले.
यूजीसी केअरचा उद्देश काय होता?
देशात बोगस संशोधनपत्रिकांचे पेव फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘यूजीसी’ने २०१९ मध्ये मान्यताप्राप्त संशोधनपत्रिकांची ‘यूजीसी केअर’ ही यादी सुरू केली. या यादीतील संशोधनपत्रिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध करणे अपेक्षित होते.
संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी संशोधनपत्रिकांसाठीचे नवे निकष
– प्राथमिक पात्रता
– संपादक मंडळाचे निकष
– संपादकीय धोरणे
– गुणवत्ता निकष
– संशोधन नैतिकता
– पोहोच
– प्रभाव