पुणे : विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा विषय शिकवला जाणार आहे. त्यासाठी चार श्रेयांकांची तरतूद करण्यात आली असून, या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या संदर्भातील परिपत्रक आणि अभ्यासक्रमाचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाटय़ाने होत असलेल्या प्रगतीमुळे खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानातील क्रांती आणि सुरक्षेशी संबंधित बाबींची वाढती मागणी पाहता सायबर सुरक्षेची गरज भासू लागली आहे. सायबर समस्यांवर योग्य तोडगा काढणे ही काळाची गरज असल्याने त्याबाबत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.

पदवीपूर्व स्तरावर सायबर सुरक्षेची मूलभूत तत्त्वे आणि मध्यम पातळीवरील अभ्यासक्रम असेल. तर पदव्युत्तर पदवी स्तरावर मध्यम आणि प्रगत पातळीवरच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रमात प्रात्यक्षिके आणि व्याख्याने यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमासाठी चार श्रेयांक देण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात काय असेल? पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात सायबर क्षेत्र, सायबर गुन्हे, सायबर गुन्ह्यांचा महिला आणि मुलांना असलेला धोका, सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, समाजमाध्यमांवरील गोपनीयता, इंटरनेट बँकिंग, डिजिटल पेमेंट, मोबाइल पेमेंट, आधार, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट सुरक्षा, मोबाइल फोन सुरक्षा, उपकरणे सुरक्षा, वाय-फाय सुरक्षा, अँटी व्हायरस, सायबर हल्ला, सायबर दहशतवाद, सायबर युद्ध, ऑनलाइन जॉब फ्रॉड, ब्लॉकचेन, सायबर गुन्हे आणि शिक्षा, सायबर सुरक्षा लेखापरीक्षण आदी पैलूंचे धडे दिले जातील.