चलनात असलेल्या बनावट नोटा जप्त व्हाव्यात म्हणून भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) बनावट नोटा तपासण्याचे अधिकार फक्त बँकांनाच दिले आहेत. तरीसुद्धा खासगी व्यक्ती, संस्था व व्यापाऱ्यांकडून त्या तपासण्यासाठी मोठय़ा प्रमाणात मशिन्सचा वापर होत आहे. त्यामुळे या नोटा व्यवहारातून बाहेर पडण्याऐवजी पुन्हा व्यवहारात राहात आहेत. पण खासगी व्यक्तींनी त्या तपासल्या नाहीत तर त्यांना भरुदड पडण्याची शक्यता असल्याने या चक्रातून बाहेर पडायचे कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बनावट चलनी नोटा ही भारतीय अर्थव्यवस्थेपुढील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. या बनावट नोटा बाजारात चलनात आणणाऱ्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचणे पोलिसांना अद्याप शक्य झालेले नाही. दरवर्षी बँकांमध्ये बनावट नोटांचा भरणा झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. बँकांकडून बनावट नोटा भरल्याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या वर्षांत देशात तब्बल २४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा बँका आणि पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यापैकी सहा कोटींच्या बनावट नोटा महाराष्ट्रातून जप्त केल्या आहेत. मात्र, अजूनही अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात बनावट नोटा फिरत असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) काही महिन्यांपूर्वी बनावट नोटांसंदर्भात सर्व बँकांसाठी एक परिपत्रक काढले. त्यामध्ये बनावट नोटांची तपासणी फक्त बँकेच्या काऊंटरवरच झाली पाहिजे, असे नमूद केले आहे. त्याबरोबरच एकूण रकमेमध्ये तीन बनावट नोट आढळून आल्यास त्या जप्त करून त्याची नोंदणी एका वहीत करावी. तीनपेक्षा जास्त नोटा बनावट आढळून आल्यास थेट पोलीस ठाण्याला कळवून त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश आहेत. बाजारात बनावट नोटा फिरत असल्यामुळे सामान्य नागरिकांना बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर पाचशे ते हजार रुपयांची नोट बनावट निघाल्यास ती बँकेकडून जप्त केली जाते. त्याचा भरुदड सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे आता व्यापारी, दुकानदार स्वत:च बनावट नोटा शोधणारी मशिन घेऊ लागले आहेत. दिवसभराच्या व्यवहारातून आलेले पैसे एकत्र केल्यानंतर ते या मशिनमधून बनावट नोटा असतील तर त्या बाहेर काढतात. उरलेली रक्कम ते बँकांत भरतात. मात्र नुकसान होण्याच्या भीतीमुळे बनावट नोटा पुन्हा चलनात आणल्या जातात. याबाबत बनावट नोटा शोधणाऱ्या मशिनची विक्री करणाऱ्या पुण्यातील एका दुकानदाराने सांगितले की, पूर्वी फक्त बँकांकडूनच बनावट नोटा शोधणाऱ्या मशिनची खरेदी होत असे. मात्र, अलीकडे व्यावसायिक, दुकानदार, मॉल, बिल्डर, ज्वेलर्स हे सुध्दा या मशिन खरेदी करत आहेत. नोटा तपासणारी मशिन ही साधारण वीस हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत.

अल्पवयीन मुलांचा वापर व छोटय़ा शहरांकडे मोर्चा!
बनावट नोटा चलनात आणण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे अलीकडे दिसून आले आहे. गरीब घरातील अल्पवयीन मुलांना चांगल्या कामाचे आमिष दाखवून त्यांना पुणे, मुंबई सारख्या शहरात आणले जाते. त्यांची राहण्याची चांगली व्यवस्था करून त्यांच्याकडे बनावट पाचशे, हजार रुपयांच्या नोटा दिल्या जातात. बाजारात जाऊन त्यांना पन्नास, शंभर रुपयांची वस्तू खरेदी करण्यासाठी पाठवले जाते. अल्पवयीन मुलांना अटक झाली तरी शिक्षा होत नाही, बनावट रॅकेटची माहिती पोलिसांना मिळत नाही. या प्रकरणी गेल्या वर्षांत बनावट नोटांच्या गुन्ह्य़ात लहान मुलांना ताब्यात घेण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे सीआयडीने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे. मोठय़ा शहरात बनावट नोटा चलनात आणत असताना पकडले जाऊ लागल्यामुळे आता या टोळींनी छोटय़ा शहरांकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या काही महिन्यात सातारा, सोलापूर, लातूर, नंदूरबार, जळगाव, वाशीम, कोल्हापूर, बुलढाणा, नाशिक या ठिकाणी बनावट नोटा चलनात आणताना काहीजणाना अटक करण्यात आली आहे.