येमेनचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा महिन्यांपासून बंद असणे, ‘आयएसआयएस’च्या इराकमधील कारवाया, कुर्दिस्तान आणि इराकदरम्यानचा संघर्ष, नायजेरियातील सार्वत्रिक निवडणुका आणि तिथल्या ‘बोको हराम’च्या कारवाया.. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा फटका २०१५ मध्ये पुण्याच्या वैद्यकीय पर्यटनाला बसला आहे. पुण्यात उपचारांसाठी येणाऱ्या येमेनी रुग्णांच्या संख्येत सरत्या वर्षी मोठी घट झाली असून त्यामार्फत होणाऱ्या उलाढालीत ६० ते ७० टक्क्य़ांची घट झाली आहे, तर शहरातील वैद्यकीय पर्यटनाची एकूण उलाढाल २५ ते ३० टक्क्य़ांनी घटली असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदवले.
भारतातील वैद्यकीय पर्यटनाचा विचार करता ‘सार्क’ देश हे मोठे ‘मार्केट’ ठरते. पण या देशातील रुग्ण प्रामुख्याने दिल्ली, कोलकाता व चेन्नईत जात असून पुण्यासाठी मध्य पूर्व देश आणि आफ्रिकन देशच महत्त्वाचे राहिले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने कर्करोगावरील व हृदयरोगावरील उपचार, अस्थिरोग उपचार व मेंदूच्या शस्त्रक्रियांसाठी येतात. परंतु पुण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जवळपास सर्व देशांना कोणत्या ना कोणत्या अस्थिरतेने ग्रासले असल्याचे चित्र आहे.
रुबी हॉल रुग्णालयाचे सरव्यवस्थापक व वैद्यकीय पर्यटन विभागाचे प्रमुख सचिन दंडवते म्हणाले,‘येमेनचे आंतरराष्ट्रीय विमानतळ गेले सहा महिने बंद असल्यामुळे तिथल्या रुग्णांची विमानप्रवासाची अडचण आहे. इराकहून येणारे रुग्ण हे देखील पुण्याच्या मेडिकल टूरिझमचा महत्त्वाचा भाग असून ‘आयएसआयएस’च्या कारवायांमुळे लोक हा प्रवास करत नाहीयेत. इराकपासून वेगळ्या होण्याच्या प्रयत्नात असलेल्या कुर्दिस्तानात सरकारने नागरिकांचे ३-४ महिन्यांपासून पगार थांबवल्यामुळे त्यांच्याकडे प्रवासासाठी पैसे नाहीत. या दोन्ही देशातील अस्थिरतेचा लोकांच्या दैनंदिन जीवनावरील परिणामामुळे मेडिकल टूरिझम लांबणीवर पडले आहे. आफ्रिकन देशांपैकी नायजेरिया हा देखील पुण्याच्या वैद्यकीय पर्यटनासाठी महत्त्वाचा असून तिथल्या सार्वत्रिक निवडणुका व ‘बोको हराम’ या संघटनेच्या कारवाया या गोष्टींमुळे तिथेही अस्थिरताच राहिली व त्याचाही येणाऱ्या रुग्णांच्या संख्येवर परिणाम दिसून आला.’’
२०१५ मध्ये पुण्याची मेडिकल टूरिझमची वार्षिक उलाढाल आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे २५ ते ३० टक्क्य़ांनी घटली. दर महिन्याला पुण्याची मेडिकल टूरिझमची उलाढाल जवळपास ३ कोटी असते, ती सरत्या वर्षांत महिन्याला साधारणत: २ कोटी राहिली आणि शहराला वार्षिक अंदाजे १० कोटींचा फटका बसला. परंतु पूर्वी पुण्यात वैद्यकीय पर्यटनासाठी न येणारे काँगो व मोझांबिक या देशातील रुग्ण नव्याने येऊ लागले, असे दंडवते यांनी सांगितले.
येमेन ते पुणे, व्हाया सौदी अरेबिया!
येमेनचे जे रुग्ण आता पुण्यात येतात त्यातल्या काही जणांना आधी सौदी अरेबियाला जाऊन मग पुण्याला यावे लागते, असे निरीक्षण संचेती रुग्णालयाचे संचालक डॉ. पराग संचेती यांनी नोंदवले. ते म्हणाले,‘आधी आमच्याकडे वर्षांला येमेनचे ८० रुग्ण यायचे, त्यांची संख्या या वर्षी २० वर आली. पण दुसरीकडे ओमानच्या रुग्णांच्या संख्येत १५ टक्क्य़ांची वाढ बघायला मिळाली. नायजेरिया, केनिया व टांझानिया येथील रुग्णांमध्येही आम्हाला वाढच दिसली. म्यानमार, बांग्लादेश, श्रीलंका, मोरोक्को, सुदान, काँगो ही मार्केटस् देखील पुण्याच्या वैद्यकीय पर्यटनासाठी खुली होत आहेत.’