लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात जलजीवन मिशन योजनेंतर्गत आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत सुमारे २८३ पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी अडीच हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. सर्वाधिक १६८ योजना पुणे जिल्ह्यात राबविल्या आहेत. कोल्हापूरमध्ये १५ योजना राबविण्यात आल्या आहेत. अद्याप पुणे विभागातील काही भागात जलजीवन मिशनची कामे सुरूच आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुणे विभागातील ग्रामीण भागात जलजीवन मिशनच्या ‘हर घर जल’ या अभियानांतर्गत नव्या आणि जुन्या योजनांचे पुनुरुज्जीवन करणे अशा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत प्रत्येक घरी पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना, जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनुरुज्जीवन, क्षमतावाढ किंवा दुरुस्ती अशी कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. त्यानुसार या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देऊन निविदा प्रक्रिया राबवण्यासह कार्यादेश दिलेली कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. तसेच या कामांना गती देऊन ती पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अभियंत्यांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने ही योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनी दिली.
पुणे विभागात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पूर्ण झालेली कामे
जिल्हा झालेली कामे झालेला खर्च
पुणे १६८ ४० कोटी ८० लाख
सातारा ४९ ६७६ कोटी ९९ लाख
सांगली २८ ५०० कोटी
सोलापूर २३ ७६० कोटी १५ लाख
कोल्हापूर १५ ६१६ कोटी २० लाख