पुणे मेट्रोचा मार्ग उन्नत (एलेव्हेटेड) स्वरूपाचा न करता तो शहराचा विचार करून उन्नत आणि भूमिगत देखील असणे आवश्यक आहे. पुणे शहरासाठी योग्य क्षमतेची प्रणाली वापरल्यास भूमिगत मेट्रो ही उन्नत मेट्रोपेक्षा कमी खर्चाची होईल. तसेच बांधकाम प्रक्रियेच्या कालखंडात नागरिकांची कमीतकमी गैरसोय होईल, असे प्रतिपादन रेल्वेच्या अधिकारी प्रशिक्षण संस्थेतील मानद व्याख्याता दिलीप भट यांनी शुक्रवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार पुण्यात मेट्रो करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलावलेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्या निर्णयाबाबत भट यांनी काही मुद्यांकडे लक्ष वेधले आहे.
या अहवालात मेट्रोचा मार्ग उन्नत स्वरूपाचा प्रस्तावित करण्यात आला असून मध्य भागातून जाणारा मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेल्या या अहवालाला भट यांनी आक्षेप घेतला आहे. पुणे शहराकरिता योग्य क्षमतेची प्रणाली वापरल्यास भूमिगत मेट्रो ही उन्नत मेट्रोपेक्षा कमी खर्चाची होते, हे मी समप्रमाण सिद्ध केले आहे, असे भट यांनी सांगितले. दिल्ली मेट्रो रेलने तयार केलेल्या पुण्याच्याच नाही तर इतर शहरातील मेट्रो प्रकल्पांच्या अहवालांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर या सर्व अहवालांमध्ये तांत्रिक व आर्थिक बाबींच्या संदर्भात कोणतीही एकसूत्रता नसल्याचे तसेच हे अहवाल अत्यंत जुजबी पद्धतीने करण्यात आल्याचे लक्षात येते, असेही भट म्हणाले.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे पुण्यासाठी ज्या पद्धतीची मेट्रो सुचवण्यात आली आहे त्या पद्धतीची पुण्याला त्याची गरज नाही. त्यामुळे मेट्रोच्या एकूणच खर्चात वाढ होते. पुण्यासाठी ‘लाईट कपॅसिटी मेट्रो’ फायद्याची आहे. त्यामुळे खर्चात मोठय़ा प्रमाणावर बचत होईल. पुणे मेट्रोचा विचार करताना शहराचा सर्वागीण विचार करणे गरजेचे आहे. मेट्रोचा मार्ग ठरवताना व्यावहारिक विचार करणे आवश्यक आहे. तसेच येथील रस्त्यांचाही विचार आवश्यक आहे, असे भट यांनी सांगितले.
शहरात उन्नत मार्ग करायचा असेल तर येथील रस्त्यांचा विचार झाला पाहिजे. उन्नत मार्गासाठी रस्त्याची रुंदी अधिक असावी लागते. तशी ती असेल तर इतर वाहतूकही त्या रस्त्यावरून सुरळित होऊ शकते. यासाठी दोन्ही मार्गाची सांगड घालून पुण्यासाठी मेट्रोचे नियोजन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.