पुणे : देशभरात उच्च शिक्षण संस्थांमध्ये दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणारे आरोग्यसेवा आणि संबंधित विषयांतील अभ्यासक्रम जुलै-ऑगस्ट २०२५ या सत्रापासून बंद करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. यूजीसीच्या ५९२व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून, दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने राबवण्यास बंदी घालण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये मानसशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, अन्न आणि आहारशास्त्र, जैवतंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
‘यूजीसी’ने याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशातील उच्च शिक्षण संस्थांनी मान्यताप्राप्त नसलेल्या परदेशी शिक्षण संस्थांशी, खासगी ऑनलाइन तंत्रज्ञान (एडटेक) कंपन्यांशी सामंजस्य करार करून सुरू केलेले पदवी, पदविका, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम अवैध असल्याचे काही दिवसांपूर्वी ‘यूजीसी’ने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक अभ्यासक्रमांबाबत ‘यूजीसी’ने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘यूजीसी’च्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय संलग्न आणि आरोग्यनिगा व्यवसाय आयोग कायदा २०२१’मध्ये (एनसीएएचपी) समाविष्ट असलेल्या कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक्रम कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेला ऑनलाइन किंवा दूरस्थ पद्धतीने राबवता येणार नाही. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या ‘यूजीसी’च्या दूरस्थ शिक्षण मंडळाच्या २४व्या कार्यगट बैठकीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी २०२५-२६या शैक्षणिक वर्षापासूनच करण्यात येणार आहे. तसेच, यापूर्वी अभ्यासक्रम राबविण्यासाठी दिलेल्या मान्यताही ‘यूजीसी’कडून मागे घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही अभ्यासक्रमांत एकापेक्षा जास्त विषय उपलब्ध असतात. उदाहरणार्थ, कला शाखेतील पदवी अभ्यासक्रमात इंग्रजी, हिंदी, पंजाबी, अर्थशास्त्र, इतिहास, गणित, सार्वजनिक प्रशासन, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, सांख्यिकी, मानवी हक्क व कर्तव्ये, संस्कृत, मानसशास्त्र, भूगोल, समाजशास्त्र किंवा महिला अभ्यास असे विषय असतात. मात्र, अशा अभ्यासक्रमांतून आरोग्यसेवेशी संबंधित विषय बंद केले जाणार आहेत. त्यामुळे जुलै-ऑगस्ट २०२५ या सत्रासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असेही नमूद करण्यात आले आहे.
‘यूजीसी’ने घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीसारख्या अभ्यासक्रमांना अलीकडे मागणी वाढत आहे. आरोग्यसेवेशी संबंधित अभ्यासक्रमांमध्ये प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा असतो. त्यामुळे आरोग्यसेवेशी संबंधित अभ्यासक्रम दूरस्थ किंवा ऑनलाइन पद्धतीने राबवणे योग्य ठरणार नाही. तसेच ऑनलाइन, दूरस्थ पद्धतीने कोणते अभ्यासक्रम राबवावेत, यावर नियंत्रण असणेही गरजेचे आहे.- डॉ. पराग काळकर,प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ