पुणे : कोंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणात खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला.कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत २ जुलै रोजी सायंकाळी कुरिअर बाॅय असल्याची बतावणी करून सदनिकेत शिरलेल्या आरोपीने बलात्कार केल्याची फिर्याद एका तरुणीने दिली होती. तरुणीची छायाचित्रे काढून तिला धमकाविण्यात आल्याची फिर्यादीत म्हटले होते. या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने तपास सुरू केला. तरुणीने दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच, सराइतांची चौकशी सुरू केली. तांत्रिक तपासात बलात्कार प्रकरणात वेगळीच माहिती पुढे आली. तरुणीच्या घरात शिरलेला आरोपी कुरिअर बाॅय नसल्याचे उघडकीस आले. तो तरुणीचा मित्र असल्याची माहिती तपासात मिळाली. दोघांमधील संवाद, छायाचित्रे, सीसीटीव्ही चित्रीकरण अशा तांत्रिक तपासाआधारे दोघांनी परस्परसंमतीने छायाचित्रे काढल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तरुणीने त्या छायाचित्रात तांत्रिक फेरबदल करून खोटा संदेश तयार केला.
तरुणीने बनावट पुरावे तयार केले. पोलीस तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे तपासात उघडकीस आले. काेंढव्यातील कथित बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जवळपास २५० ठिकाणची छायाचित्रे तपासली होती. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने खोटी फिर्याद देऊन दिशाभूल केल्याचे उघडकीस आले.त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. खोटी फिर्याद देणाऱ्या तरुणीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २१२, २१७, २२८, २२९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास
खोटा पुरावा तयार करून पोलीस, तसेच ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. त्या तरुणीची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणीही करण्यात आली. खोटी फिर्याद देण्यामागचा तरुणीचा उद्देश काय आहे, हे तिने सांगितले नाही. न्यायालयाच्या परवानगीनंतर गुन्ह्याचा तपास करून तिने खोटी फिर्याद का दिली, याचा तपास केला जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तरुणीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.- डाॅ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच