पुणे : अवकाळी पाऊस, तसेच उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. ढोबळी मिरची, फ्लाॅवर, शेवगा, गाजर या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ५ ट्रक मटार, कर्नाटकातून १ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच २ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ६ ते ७ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १२ ते १३ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५५० ते ६०० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, कांदा ७५ ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ट्रक बटाट्याची आवक झाली.

कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ

कोथिंबीर, मेथीच्या दरात वाढ झाली. कोथिंबिरीला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ३५ हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – १५०० ते २५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात- ८०० ते १५००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ६००, पुदिना – ३०० ते ५००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ६००, चुका – ४०० ते ८००, चवळई- ३००-६००, पालक- ८००- १५००

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंब्यांना मागणी; अन्य फळांचे दर स्थिर

आंब्यांची आवक वाढली असून, मागणीही चांगली आहे. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लिंबांच्या गोणीमागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. घाऊक फळबाजराता रविवारी मोसंबी ३५ ते ५० टन, संत्री १ टन,डाळिंब १५ ते २० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे दाेन ते अडीच हजार गोणी, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज १५ ते २० टेम्पो, चिकू दोन हजार खोकी, पेरू १५० ते २०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), तसेच केरळहून ६ ट्क अननस अशी आवक झाली.