वाचनाची आवड कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त होत असताना तंत्रज्ञानाभिमुख युवा पिढीमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेने प्रथमच अस्सल मराठी ई-बुक्स सादर करून साहित्याचा खजिना खुला केला आहे. या ई-बुक्समुळे संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट यासह आयफोन, आयपॅड या माध्यमातून मराठी साहित्य वाचनाची सुविधा निर्माण झाली आहे.
रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीचा सुवर्णमहोत्सव नुकताच झाला आहे. या कादंबरीवर निर्मिती झालेल्या ‘स्वामी’ मालिकेतील ‘रमा’ म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ‘माधवराव पेशवे’ म्हणजे अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या हस्ते मराठी ई-बुक्सचे अनावरण करण्यात आले. दिमाख कन्सल्टंट्सचे दिमाख सहस्रबुद्धे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते.
मेहता पब्लिशिंग हाऊसने तयार केलेली ही ई-बुक्स देशातील पहिली ‘डिजिटल राईट्स मॅनेजमेंट (डीआरएम) एनेबल्ड मराठी ई-बुक्स आहेत. उच्च दर्जा, वापरण्यास सुलभ, फाँटची सहजपणे दृश्यता या वैशिष्टय़ांबरोबरच पायरसी फ्री असल्याने अन्य ई-बुक्सच्या तुलनेत ती श्रेष्ठ आणि दर्जेदार ठरतात. ई-बुक्समुळे जागा तर वाचतेच, पण त्याचबरोबर पीसी, लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ती सहजपणे उपलब्ध होऊ शकतात, अशी माहिती दिमाख सहस्रबुद्धे यांनी दिली. मराठीतील दर्जेदार साहित्यकृती देशभरामध्ये आणि जागतिक पातळीवर पोहोचवाव्यात. या माध्यमातून जनमानसात मराठीचा वाचनाची भाषा म्हणून प्रसार व्हावा ही ई-बुक्स प्रकल्पामागची भूमिका असल्याचे सुनील मेहता यांनी सांगितले. मुद्रित माध्यम आणि ई-बुक्स हे दोन्ही समांतर प्रवाह आहेत, असेही त्यांनी सांगितले.
रवींद्र मंकणी म्हणाले, चित्रीकरणादरम्यान मिळणाऱ्या मोकळ्या वेळात मी वाचन करतो. मी या तंत्रज्ञानापासून दूर असलो तरी मुलाकडून ते शिकून घेईन आणि ई-बुक्स वाचनाचा आनंद मिळवेन.
मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ई-बुक्सशी माझे नाते जुळले असले तरी पुस्तकांची नाळ तुटलेली नाही. माझा मुलगा इंटरनेटवर मराठी पुस्तकांचे वाचन करेल.