मनसेचे नेते वसंत मोरे यांनी शहर सुकाणू समितीवर थेट आरोप केल्याचे तीव्र पडसाद पुणे शहर मनसेत उमटले. वसंत मोरेंच्या आरोपानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक शहर कार्यालयात झाली. मोरे हे आरोप करून पक्षाची बदनामी करत आहेत, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांची केली.
दरम्यान, वसंत मोरे यांच्या आरोपांवर चर्चा झाली नाही. मात्र येत्या दोन दिवसांत मोरे यांच्या आरोपांचा खुलासा केला जाईल, असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

हेही वाचा- बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद! स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी वेळोवेळी जाहीर टीका आणि नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा जाहीर प्रस्ताव तीन दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे नाराज वसंत मोरे मनसेला ‘ जय महाराष्ट्र’ करणार, अशी चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर स्पष्टीकरण देताना पक्ष सोडणार नाही असे सांगतानाच मोरे यांनी सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केले होते. पक्षात सातत्याने मुस्काटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप मोरे यांनी केला होता. त्यातच मोरे यांचे कट्टर समर्थक माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची राज ठाकरे यांनी पदावरून हकालपट्टी केली होती. त्यामुळे माझिरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. माझिरे यांच्या तीन ते चार समर्थक पदाधिकाऱ्यांनीही माथाडी कामगार सेनेच्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र चारशे कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली होती. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीची बैठक शहर मध्यवर्ती कार्यालयात झाली.

हेही वाचा- पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड, हडपसरमध्ये; कसब्यात महिला मतदारांची संख्या अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकाणू समितीच्या कार्यपद्धतीवर टीका आणि पदाधिकाऱ्यांवर आरोप करत असल्याने पक्षाची बदनामी होत आहे, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. मात्र, सुकाणू समितीच्या बैठक आरोपांच्या पार्श्वभूमीवर नव्हती. दर मंगळवारी साप्ताहिक बैठक होते. त्यानुसार ही बैठक झाली. वसंत मोरेंच्या आरोपांबाबत शहर पदाधिकाऱ्यांकडून येत्या दोन दिवसांत खुलासा करण्यात येईल, असे मनसे नेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनसे शहर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. राज ठाकरे यांच्या दरबारीच हा विषय निकाली काढण्यात येणार आहे, अशी चर्चा मनसेत सुरू झाली आहे.