पुणे : विद्यार्थी व्हिसासाठीच्या नव्या मुलाखतींसाठी वेळा देऊ नका, असे आदेश अमेरिकेने अचानक त्यांच्या दूतावासांना दिल्याने अमेरिकेत शिकायला जाऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि पालक अचंबित असले, तरी सध्या ‘थांबा आणि पाहा’ हे धोरण उत्तम असल्याचे अमेरिकेतील शिक्षणासंदर्भातील जाणकारांचे म्हणणे आहे. तर, हा केवळ ‘अमेरिका प्रथम’साठी चाललेला खटाटोप नसून, परदेशातील उत्तम शैक्षणिक कामगिरी असलेले विद्यार्थीच यावेत, यासाठीचा प्रयत्न असू शकतो, असे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे.

अमेरिकेत शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या जगभरातील विविध देशांतील विद्यार्थ्यांसाठी व्हिसासाठीच्या मुलाखतींकरिता नव्याने वेळा देऊ नका, असे अमेरिकेने बुधवारी अचानक जाहीर केल्याने अमेरिकेत शिकण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्हिसासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची आणखी कठोर छाननी करण्याचा अमेरिकी सरकारचा उद्देश असल्याने नव्या मुलाखतींसाठी वेळ न देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते. विद्यार्थ्यांच्या समाज माध्यमांवरील वावराची, त्यांच्या यावरील सर्वच सार्वजनिक मतांची पडताळणी करण्यात येणार आहे. अमेरिकन विद्यापीठांतील पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवायांचीही याला पार्श्वभूमी आहे.

‘प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचा समाज माध्यमांतील वावर काही वर्षे अगोदरपासून तपासला जातो आहे, त्यामुळे त्यात नवे काही नाही. कृत्रिम प्रज्ञेद्वारे त्याची पडताळणी करण्याची नवी पद्धती वापरून यंदा तो केला जाईल, अशी चर्चा असल्याने व्हिसासाठीच्या नव्या मुलाखती तात्पुरत्या थांबविण्यात आल्या असाव्यात,’ असा अंदाज पुण्यातील दिलीप ओक्स ॲकॅडमीचे संचालक दिलीप ओक यांनी व्यक्त केला.

अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. ‘ओपन डोअर्स’च्या २०२४ च्या अहवालानुसार, २०२३ मध्ये अमेरिकेत ३ लाख ३१ हजार ६०२ विद्यार्थी शिकत होते. त्यामुळे नव्या निर्बंधांचा भारतीय विद्यार्थ्यांना अधिक फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘अमेरिका आता त्यांच्या विद्यापीठांत सरसकट परदेशी विद्यार्थी न घेता उत्तम शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देईल, या धोरणात्मक बदलाचा हा प्राथमिक टप्पा असू शकतो,’ असे मत आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमाचा दीर्घ अनुभव असलेल्या, खासगी विद्यापीठातील एका प्राध्यापकाने व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळवून डॉलरमधील पगाराच्या मिषाने अमेरिका गाठतात. अत्युत्तम शैक्षणिक कामगिरी करून तंत्रज्ञान, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांसाठी किंवा संशोधनासाठी जाणारे विद्यार्थी कमी आहेत. ब्रिटन आणि अन्य युरोपीय देशांनी ज्याप्रमाणे केवळ उत्तम शैक्षणिक कामगिरीच्या निकषावर विद्यापीठांत प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे, तसाच उद्देश अमेरिकाचाही असू शकतो. शिवाय, तेथील अनेक राज्य विद्यापीठांनी पैसे मिळतात म्हणून भरमसाट परदेशी विद्यार्थी घेण्यास सुरुवात केल्याने त्याला आळा घालणे हाही एक उद्देश असू शकतो.’

अर्थात, भारतीय विद्यार्थी ही अमेरिकेसाठी मोठी बाजारपेठ असल्याने हे निर्बंध विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने नसावेत, असे ओक यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘नियम पाळून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फारशी अडचण येत नाही. त्यामुळे निर्बंधांबाबत आत्ताच काही निष्कर्ष काढण्याऐवजी आणि विद्यार्थी-पालकांनी घाबरून जाण्याऐवजी थोडा काळ थांबल्यास अधिक स्पष्टता येईल.

‘चालू वेळापत्रकात बदल नाही’नव्या मुलाखतींसाठी वेळ न देण्याचा निर्णय घेताना, अमेरिकेने पुढील महिन्यात ज्या विद्यार्थी व्हिसा मुलाखतींसाठी वेळा नक्की केलेल्या आहेत, ते वेळापत्रक बदलले किंवा थांबवलेले नसल्याकडे दिलीप ओक यांनी लक्ष वेधले. यातील बहुतेक मुलाखती सप्टेंबरमधील प्रवेशांसाठीच्या असल्याने त्यावर नव्या निर्बंधांचा फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही, असे प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील अन्य एका जाणकाराने नमूद केले.

विद्यार्थी-पालकांत संभ्रमअमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी-पालकांत प्रचंड गोंधळ, संभ्रमाचे वातावरण जाणवते. काही विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते या विषयासंदर्भात माध्यमांशी खुलेपणाने बोलायला तयार नाहीत. सध्या अमेरिकेत शिकत असलेले आणि सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळालेले किंवा त्यासाठी व्हिसा मुलाखतीची वेळ मिळालेलेही गोंधळात आहेत. ‘आपल्या समाज माध्यमांवरील वावरात सध्याचे अमेरिकी सरकार वा अध्यक्षांबद्दल विरोधी किंवा वावगी टिप्पणी केली गेलेली नाही ना, हे तपासून बघा,’ अशा संदेशांची देवाणघेवाणही त्यांच्यात होत असल्याची माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका पालकाने दिली.

नव्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे व गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे ऑगस्टनंतर एक महिना उशिरा हजर राहू शकतो का, या संदर्भात संबंधित विद्यापीठांकडे ई-मेलवरून विचारणा करावी, असे विद्यार्थ्यांना सुचवले आहे. अशी परिस्थिती २०१७ आणि २०२० मध्येही उद्भवली होती. मात्र काही दिवसांनंतर विद्यार्थी व्हिसा प्रक्रिया सुरू करण्यात आली, त्यामुळे आताही काही दिवस थांबून विद्यार्थी व्हिसा मुलाखतीसाठी प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.- बख्तावर कृष्णन, इन्स्पायरस एज्युकेशन करिअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, आता अमेरिकेच्या विद्यार्थी व्हिसा मुलाखतीसाठी कोणतेही नवीन ‘स्लॉट’ उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुढे काय होईल, याची भीती आहे. मुलाखतीचे नवीन स्लॉट उपलब्ध होण्याची वाट पाहत आहे. – अमेरिकेत जाऊ इच्छिणारा विद्यार्थी