राज्यांसह खुल्या बाजारात लसविक्रीस केंद्राने मुभा दिल्यानंतर देशातील सर्वांत मोठी लसउत्पादक कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी ‘कोव्हिशिल्ड’ लशीची किंमत जाहीर केली. त्यानुसार राज्य सरकारांना ४००, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना लसमात्रा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात लसलाभार्थ्यांना किती पैसे मोजावे लागतील, हे अद्याप अस्पष्ट आहे.

लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना १ मेपासून लस देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. त्याच वेळी सरकारने खुल्या बाजारासह राज्यांना लसविक्री करण्यास निर्मात्यांना मुभा दिली. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ‘कोव्हिशिल्ड’ लशीची किं मत जाहीर के ली.

एकू ण उत्पादनाच्या ५० टक्के  लशींचा साठा केंद्र सरकारला तर उर्वरित ५० टक्के  साठा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाणार असल्याचे या पत्रकातून सीरमने स्पष्ट केले. पुढील चार ते पाच महिन्यांत देशात लस किरकोळ विक्रीसाठी खुली होईल, अशी माहितीही सीरमने दिली.

भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्मिती होत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ लस सध्या जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या इतर लशींच्या तुलनेत स्वस्त आहे. अमेरिकन कं पनीची लस प्रति मात्रा १५०० रुपये, तर रशियन आणि चिनी कं पन्यांची लस प्रति मात्रा ७५० रुपयांना उपलब्ध आहे, अशी माहितीही सीरमकडून देण्यात आली आहे.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्विटरद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लस उत्पादन आणि वितरण यासाठी के लेल्या आर्थिक साहाय्याबद्दल आभार मानले आहेत.

वेगवान लसउत्पादनाचे प्रयत्न

नवी दिल्ली : लशींचे वेगाने उत्पादन वाढवून कमीतकमी कालावधीत त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने आतापर्यंत तीन लशींना आपत्कालीन वापरास परवानगी दिली असून, आणखी चार-पाच लशी दृष्टिपथात आहेत, असे जैव-तंत्रज्ञान सचिव रेणू स्वरूप यांनी सांगितले. झायडस कॅडिला, बायोलॉजिकल ई, जिनोव्हा आणि भारत बायोटेक यांना ४०० कोटींचे अर्थसाहाय्य करण्यात येत असल्याचेही स्वरूप यांनी स्पष्ट केले.

लसीकरणात ९० टक्के वाटा

देशात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा प्रामुख्याने वापर होत आहे. देशातील संपूर्ण लसीकरणात ‘कोव्हिशिल्ड’चा वाटा ९० टक्के आहे. देशात आतापर्यंत १२.७६ कोटी जणांना लस देण्यात आली.

पहिल्या मात्रेनंतर २१ हजार बाधित

‘कोव्हिशिल्ड’ किंवा ‘कोव्हॅक्सिन’ लशीची पहिली मात्रा घेतल्यानंतर देशात आतापर्यंत २१ हजार जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच दुसऱ्या मात्रेनंतर ५,५०० जणांना करोनाची लागण झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.

देशात २४ तासांत २,०२३ करोनाबळी

देशात बुधवारी करोनाचे २,९५,०४१ रुग्ण आढळले. तसेच दिवसभरात २,०२३ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

‘कोव्हॅक्सिन’ ७८ टक्के परिणामकारक

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिन लस ही करोनाच्या सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या सर्व रुग्णांत ७८ टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती ही लस उत्पादित करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने दिली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष कंपनीने बुधवारी जाहीर केले.