पुणे : आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. महात्मा फुले मंडईत शेतकऱ्यांनी विक्रीस पाठविलेल्या वाघाटीला १२०० रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी भाव मिळाला. डोंगररांगांत नैसर्गिकरीत्या उगविणारी वाघाटीची काटेरी झाडे तशी दुर्लक्षित असतात. ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना वाघाटीच्या झाडांची माहिती असते.
आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली. आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. नवीन पिढीला या भाजीविषयी फारशी माहिती नाही. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वाघाटी बाजारात विक्रीस पाठविली. महात्मा फुले मंडईत एकूण मिळून १०० किलो वाघाटीची आवक झाली, अशी माहिती महात्मा फुले मंडईतील भाजीपाला व्यापारी रवींद्र खांदवे यांनी दिली.
आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वाघाटीची भाजी आणि भाकरी असा बेत करतात. वाघाटीची भाजी खाऊन उपवास सोडण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही आहे. दर वर्षी आषाढी एकादशीला ग्रामीण भागातील शेतकरी न चुकता बाजारात वाघाटी महात्मा फुले मंडईत विक्रीस पाठवितात. वाघाटी ठरावीक भाजीपाला विक्रेत्यांकडे मिळते. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा वाघाटी विक्रीस पाठविली. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाला, असे त्यांनी सांगितले.
वाघाटी आणि करटूल यात फरक काय?
वाघाटीची भाजी नैसर्गिकरीत्या येते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत वाघाटीची काटेरी झाडे असतात. शेतकरी काटेरी जाळीत असलेली वाघाटीची फळे तोडतात. वाघाटी आणि करटूल या दोन भाज्यांमध्ये फरक आहे. वाघाटाची फळे बेलफळाप्रमाणे असतात. आकाराने वाघाटीची फळे मध्यम असतात. करटूल काटेरी असते, असे भाजीपाला विक्रेते रवींद्र खांदवे यांनी सांगितले.