लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : ‘विचार आणि तर्काची चौकट कोरडी असते. भावनेच्या आधाराने केलेली कामे सातत्याने सुरू राहतात. त्यामुळे काम करताना विचार आणि तर्कासोबत भावनेची जोडही असायला हवी,’ असे मत जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे यांनी बुधवारी व्यक्त केले.

‘चैत्राली फाउंडेशन’तर्फे चैत्राली इंदोरे यांच्या स्मृतीत पहिला ‘चैत्राली सन्मान पुरस्कार’ पतंगे यांना ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजय तांबट, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. धोंडिराम पवार, भारतीय जनता प्रदेश युवा मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रा. निवेदिता एकबोटे, फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तम इंदोरे आदी उपस्थित होते. यावेळी चैत्राली इंदोरे यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या ‘शी इज… चैत्रालीज ड्रीम बुक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पतंगे म्हणाल्या, ‘समाजात स्थिर होण्याच्या भ्रामक कल्पना आहेत. त्यांमुळे मुलींना काम करताना अनेक मर्यादा येतात. तिची स्वप्ने पूर्ण करताना संघर्ष करावा लागतो. ठरवलं तर सगळी व्यवस्था पालटून टाकण्याची क्षमता मुलींमध्ये असते, पण तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा समाज नसतो. स्त्रियांच्या आयुष्यात चांगले वडील आणि चांगला जीवनसाथी असेल, तर तिला वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक शिक्क्यांपलीकडे जाऊन काम करता येते. अनेक स्त्रियांच्या यशोगाथांचा गुणाकार व्हायला हवा. तेव्हाच सगळ्या स्त्रिया पुढे जाऊ शकतील, खऱ्या अर्थाने प्रगती करतील. समाजानेही याची जबाबदारी घ्यायला हवी.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चैत्रालीसारख्या गुणी मुलांचे लवकर जाणे ही केवळ एका कुटुंबाची हाणी नसते. त्याने समाजाचेही मोठे नुकसान होते,’ अशा शब्दांत डॉ. तांबट यांनी चैत्रालीला श्रद्धांजली वाहिली.