पुणे : वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाणला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल केल्याप्रकरणी शशांक हगवणे यालाही १४ जूनपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शस्त्र परवान्यासाठी दोघांनी बनावट आधारकार्ड तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक (वय २७, रा. भुकूम, मुळशी) आणि हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय मित्र नीलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शशांक आणि नीलेश यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ‘आरोपी चव्हाणने वैष्णवी यांच्या बाळाची काळजी घेतली नाही. बाळाचा ताबा घेण्यासाठी घेण्यासाठी आलेल्या कस्पटे कुटुंबीयांना चव्हाणने पिस्तुलाचा धाक दाखविला. चव्हाणने पिस्तुलाचा धाकाने आणखी कोणाला धमकावले आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
शशांकने बनावट कागदपत्रे सादर करून शस्त्र परवाना मिळविला. बनावट कागदपत्रे तयार करून त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. दोघांनी बनावट आधारकार्ड तयार केल्याचा संशय आहे. आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी,’ अशी विनंती तपास अधिकारी सहायक निरीक्षक सचिन पाटील, सचिन तरडे आणि सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केली. आरोपींच्या वतीने ॲड. स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली.