संजय जाधव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याचा धडाका लावला आहे. देशभरात सध्या एकूण १८ वंदे भारत सुरू आहेत. यातील मुंबई ते सोलापूर वंदे भारतला सर्वाधिक प्रवासी असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मात्र, प्रवासी संख्या जास्त असूनही या गाडीचे उत्पन्न सुमारे ५० टक्केच असल्याची बाब समोर आली आहे.

केंद्र सरकार आणि रेल्वेकडून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचा दावा केला जातो. वंदे भारत सेमी-हायस्पीड असून, त्यात जागतिक दर्जाच्या सुविधा प्रवाशांना दिल्या जात आहेत. यामुळे या गाडीचे तिकीटही इतर एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे. मुंबई ते सोलापूर या गाडीला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. या गाडीची प्रवासी संख्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे कागदोपत्री दिसते. मात्र, उत्पन्न ५० टक्क्यांच्या आसपास आहे.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परीक्षेत गैरप्रकार: इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा ‘असा’ केला वापर

मुंबई-सोलापूर वंदे भारत ही गाडी १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. फेबुवारी महिन्यात या गाडीच्या एकूण ३२ फेऱ्या झाल्या. गाडीतील प्रवासी संख्या ९० टक्के होती. त्यातून मिळालेले उत्पन्न ५८ टक्के होते. मार्च महिन्यात गाडीच्या ५२ फेऱ्या झाल्या. या महिन्यात प्रवाशांची संख्या ७८ टक्के आणि उत्पन्न ५१ टक्के होते. एप्रिल महिन्यात गाडीच्या ५२ फेऱ्या झाल्या. या महिन्यात प्रवासी संख्या ९४ टक्के तर उत्पन्न ६१ टक्के होते.

प्रवासी संख्येचे असेही गणित

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेसचे एसी चेअरचे तिकीट ८५९ रुपये, तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारचे तिकीट एक हजार ७६६ रुपये आहे. जास्त तिकीट दरामुळे मुंबई ते सोलापूर प्रवासात मुंबई ते पुणे दरम्यानच्या प्रवाशांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक असते. पुढे पुण्यापासून सोलापूरपर्यंत गाडीत जेमतेम २० टक्केच प्रवासी उरतात. गाडीतील एकूण प्रवाशांची संख्या विचारात घेतली जाते. मात्र, जवळच्या अंतरात प्रवासी जास्त असले, तरी तिकीट कमी असल्याने उत्पन्न कमी मिळते.

Story img Loader