संत साहित्य संमेलनाला प्रारंभ
राज्यावर दुष्काळाची आपत्ती आहे. त्यामुळे या आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विचारांच्या, पक्षांच्या मंडळींनी एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. प्रबोधनाच्या नुसत्या विचारांपेक्षा कृतिशील योजनांवर भर द्यायला हवा, असे मत बद्रिनाथ महाराज तनपुरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
वारकरी संप्रदायात एकमेकांना जोडण्याची आणि समाजातील प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. त्यातूनच वारकरी संप्रदाय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजाचे दु:ख दूर करण्याच्या प्रयत्नात आहे, असेही ते म्हणाले.
वारकरी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमात संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तनपुरे बोलत होते. खासदार रामदास आठवले, माजी मंत्री जयंत पाटील, बबनराव पाचपुते, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव मोहिते आदींची यावेळी उपस्थिती होती.
उद्घाटन समारंभात तनपुरे म्हणाले की, दुष्काळामुळे आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. याला केवळ निसर्गाची अवकृपा म्हणता येणार नाही. शासननिर्णय, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, दलाल हे घटकही कारणीभूत आहेत. सर्वात सामान्य घटक म्हणून शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे कारण शेती हाच देशाचा आत्मा आहे. वारकरी संप्रदायात एकमेकांना जोडण्याची आणि समाजातील प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. त्यातूनच वारकरी संप्रदाय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजाचे दु:ख दूर करण्याच्या प्रयत्नात आहे.
कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पुरोगामी विचारांचा समाज घडवण्यासाठी संतांचे विचारच उपयुक्त ठरणार आहेत. समाजाला एकसंध ठेवण्याची ताकद संत साहित्यात आहे. पण सध्या सत्तेत काही सनातनी आहेत, हे राज्याला लागलेले ग्रहणच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण पुरोगामी समाज आणि राज्य घडवण्याचा संकल्प करू.
जयंत पाटील म्हणाले, कर्मकांड आणि अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी संतांनी आपले आयुष्य वेचले. असा संतविचारांचा वारसा आपल्याला लाभला आहे आणि संत साहित्य संमेलनातून हा वारसा पुढे नेण्याचे काम होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varkari community has power to connect society
First published on: 22-05-2016 at 00:20 IST