पुण्यामधील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आली आहे. रुपेश मोरे यांच्या नावाने एक चिठ्ठी आली असून त्यामध्ये, “सावध राहा रुपेश” असा मजकूर लिहिण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> “…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकावण्यात आल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया
वसंत मोरेंचे पुत्र रुपेश हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळेस ते कार्यक्रमामधून परत आले तेव्हा गाडीच्या बोनेटवर व्हायपर्सजवळ त्यांना ही चिठ्ठी सापडली. अज्ञात इसमाने रुपेश मोरे याच्या गाडीवर चिठ्ठी ठेवली होती असं तक्रारीत म्हटलं आहे. ही चिठ्ठी रुपेश यांनी घरी आल्यावर पाहिल्याचं वसंत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी या प्रकरणामध्ये पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय.
१३ जून रोजी या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली आहे. १२ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचं आयोजन रुपेश मोरे यांनी केलं होतं. या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी रुपेश हे कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. गाडीने कार्यक्रमस्थळी आल्यानंतर रुपेश यांनी पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रुपेश हे गाडीजवळ गेले असता. त्यांना गाडीच्या समोरील बाजूला वायपरखाली एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये ‘सावध राहा रुपेश’ असा मजकूर लिहिलेला आहे.

या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नक्की वाचा >> “…म्हणून आम्ही त्या महिलेसोबत थांबलो”; वसंत मोरेंनी कौतुक केलेल्या कंडक्टरने सांगितलं नेमकं त्या रात्री काय घडलं
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याविरोधातील भूमिका जाहीर केल्यापासून वसंत मोरे चांगलेच चर्चेत आहेत. राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नसल्यापासून ते ‘शिवतिर्थ’वर राज यांची घेतलेली भेट, पक्षांतराच्या चर्चा या साऱ्या गोष्टींमुळे मोरे मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असतानाच आता त्यांच्या मुलाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत.