पुणे शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची वस्तुस्थिती महापालिकेच्या अहवालातून समोर आली आहे. जून महिन्याअखेरपर्यंत शहरात ३३ लाख २४ हजार ५८२ एवढी वाहनांची नोंद असून, वर्षभरात (२०२० ते २०२१) १ लाख ७० हजार ११५ एवढ्या नव्या वाहनांची नोंद झाली आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता माणशी एक वाहन असेच चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. २०१९ ते २०२० या कालावधीत १ लाख ५० हजार ४८४ नव्या वाहनांची नोंद झाली होती.

महापालिकेचा सन २०२१-२२ या वर्षासाठीचा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला. महापालिकेचे विविध विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटीएम, पीएमपी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि अन्य स्त्रोतांद्वारे मिळालेल्या माहितीवर हा अहवाल आधारित आहे. त्यामध्ये शहरातील वाहनांची संख्या वाढत असल्याचा निकर्ष नोंदविण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त वाहनांची नोंदणी –

शहरात जून २०२२ पर्यंत ३३ लाख २४ हजार ५८२ एवढी वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. सन २०२० च्या तुलनेत १ लाख ७० हजार ११५ एवढ्या नवीन वाहनांची नोंद झाली आहे. सन २०२० च्या तुलनेत २०२१ मधील नव्या वाहनांच्या नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी सन २०१८ आणि सन २०१९ च्या तुलनेत नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये घट झाल्याचे चित्र होते. २०२१ मध्ये वाढ झालेल्या १ लाख ७० हजार ११५ नवीन वाहनांपैकी १ लाख २ हजार ९५३ दुचाकी, तर ६२ हजार १९२ चारचाकी, तसेच ४ हजार ९७० तीन चाकी वाहनांचा समावेश आहे. संपूर्ण वर्षात मे महिन्यात सर्वात कमी तर नोव्हेंबर महिन्यात सर्वात जास्त वाहनांची नोंदणी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्षात ६ हजार २१९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. नव्याने नोंदणी झालेल्या वाहनांपैकी १ लाख ६० ९८८ वाहने सल्फरचे उत्सर्जन कमी करणारी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवा प्रदूषणात पुन्हा वाढ –

वाहनातून उत्सर्जित होणाऱ्या धुराचा हवा प्रदूषणात मोठा वाटा आहे. ८० टक्के कार्बन मोनाॅक्साईड हा वाहनातील धुरामधून येतो. टाळेबंदीच्या काळात एप्रिल ते मे २०२० मध्ये रस्त्यावरील वाहतूक नगण्य होती. तसेच व्यावसायिक, खासगी ठिकाणे बंद असल्याने हवा प्रदूषणाची पातळी कमी झाली होती. मात्र प्रदूषणाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे.

अहवालातील अन्य बाबी –

-१९,७८,८६६.२२ चौरस मीटर हरित क्षेत्र

-५१,०३,६०२ वृक्षांची नोंद

-२१०० ते २२०० मेट्रिक टन घनकचरा निर्मिती

-घरगुती, व्यावसायिक स्वरूपात सौर पॅनेलाचा वापर करून ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
१६,२०,४२,१४० युनिट अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती

-सार्वजनिक वाहतुकीसाठी २२५५ गाड्या