पिंपरी: पिंपरी पालिकेच्या वतीने घरकुलमध्ये होणारे गाळ्यांचे वाटप अन्यायकारक आहे. ‘हॉकर्स झोन’ पुनर्वसनाच्या नावाखाली फेरीवाल्यांची, विक्रेत्यांची फसवणूक होत आहे, अशी तक्रार टपरी, हातगाडी, पथारीवाले संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे. गाळेवाटपात गैरप्रकार झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी अनस्थाच दाखवली, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.
बाबा कांबळे यांच्या उपस्थितीत चिखली घरकुल येथे पथारीवाले, विक्रेते, व्यावसायिकांची बैठक झाली. या वेळी अनेकांनी गाळेवाटपाविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्यावर अन्याय झाल्याचे सांगून योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेकडे केली. यासंदर्भात आयुक्त राजेश पाटील, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याशी संघटनेची चर्चा झाली. प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याचे कांबळे यांनी पत्रकारांना सांगितले.
बैठकीत बोलताना कांबळे म्हणाले, २००५ पासून फेरीवाल्यांसाठी संघर्ष सुरू आहे. २००७ मध्ये फेरीवाल्यांचा पहिला कायदा मंजूर झाला. फेरीवाल्यांना सुविधा, फेरीवाल्यांचे पुनर्वसन अशा अनेक मुद्द्यांची त्यात तरतूद होती. मात्र, अधिकारी त्या कायद्यांची अंमलबजावणी करत नाहीत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया मनमानी पध्दतीने सुरू आहे. क्षेत्रीय कार्यालयात अनागोंदी कारभार होत आहे. कृष्णानगर येथील भाजी मंडईत गाळेवाटपात अधिकाऱ्यांनी एका गाळ्यासाठी ५० हजार रूपये घेतल्याचे आरोप झाले. या सर्व प्रश्नांत आयुक्त लक्ष घालतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांनी अनस्थाच दाखवली. गाळेवाटपात कायदे पायदळी तुडवण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. यावर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी दिला.