महागाई काय मोदींनी वाढविली का, असाही सवाल; भाजप-सेना युती गरजेची असल्याची भूमिका

पुणे : अभिनेत्री कंगना राणावतने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले. त्याचबरोबर महागाई काय मोदींनी वाढविली का, असा सवाल त्यांनी केला. संकटाच्या कडय़ावरून देशाला मागे खेचायचे असेल आणि हे चुकलेले गणित सुधारायचे असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी रविवारी पुण्यात मांडली.

ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्दय़ांवर भाष्य केले.

कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केले. स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या योद्धय़ांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिपणीही त्यांनी केली.

महागाई काय मोदींनी वाढवली आहे का ? असा सवाल करून ते म्हणाले,की जे लोक पक्षाचं काम करतात त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही. पक्षाचे काम सगळेच करतात. मोदी जेव्हा पक्षासाठी काम करतात तेव्हा मी त्यांच्या बाजूने उभा राहत नाही, पण मोदी जेव्हा देशासाठी उभे राहतात तेव्हा ते माझे आदर्श नायक असतात. एका बॅरेलची किती किंमत झाली आहे तुम्हाला माहिती आहे का ? हॉटेलमध्ये एका वेळी तुम्ही १० हजार रुपये खर्च करू शकता, पण एक व्यक्ती देशात गेल्या ७० वर्षांपासून जी घाण साचली आहे ती साफ करत आहे, त्याला काही काळ का होईना मदत करता येत नाही?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राजकारणातील खेळ इतक्या विचित्र स्तरावर पोहाचले आहेत, की त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस भरडला जात आहे. संकटाच्या कडय़ावरून देशाला मागे खेचायचे असेल आणि हे चुकलेले गणित सुधारायचे असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. ज्या कारणासाठी बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली, मराठी माणसाला आधार दिला आणि मराठी माणसासाठी आपला देह ठेवला, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील? याची कल्पना फक्त जे आता बाहेर राहून केवळ बघत आहेत, त्यांनाच येऊ शकते. त्यातलाच मीही एक आहे. एसटी कामगारांच्या आंदोलनाबाबत गोखले म्हणाले, की एसटी महामंडाळाचा मी एकेकाळी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर होतो. एसटीच्या एकूण अर्थशास्त्रावर मी लिहिलेल्या लेखावर विद्वान लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या, एवढा अभ्यास एसटी महामंडळातील सर्वोच्च अधिकाऱ्याने देखील केला नसेल. एसटी आणि एअर इंडियाला गाळात घालण्याचे काम राजकीय लोकांनी केलेले आहे.