पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे (वय ८८) यांचे खासगी रुग्णालयात रविवारी निधन झाले. बालसाहित्यातील योगदानासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

भावे यांचा जन्म १९३७मध्ये झाला. ते मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. त्यांनी श्री. ग. माजगावकर यांच्या ‘माणूस’ साप्ताहिकात स्तंभलेखन, वृत्तपत्रांमध्येही लेखन केले. त्यांचे ‘वडापाव’ हे सदर गाजले होते. तसेच त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून काम काम केले होते. त्यांनी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची ५०हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. विशेषत: बालसाहित्यकार म्हणून त्यांची ओळख होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बालसाहित्यामध्ये बालकविता, कथा, कादंबरी असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ‘एरिक लोमॅक्सच्या दीर्घ प्रवास’, ‘अग्गड हत्ती तग्गड बंब’, ‘डोंगरगावची चेटकीण’, ‘चिक्कीखाव’, ‘चल रे भोपळो टुणुक टुणुक’, ‘मिठाईमॅड गुडबॉय,’ ‘गिरकी घेऊन कबुतर सांगतंय’, ‘ॐ कासवाय नम:’, ‘सांगा सांगा ढगोजीबाप्पा’, ‘टिंबाराणी आणि इतर गोष्टी’, ‘युद्धकथा’, ‘माँटीज डबल’, ‘मीच मान्या मीच मेरी’ अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.