कार्यकर्त्यांची कसरत, मतदारांमध्ये संभ्रमावस्था

शहरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रचार करताना कसरत करावी लागते आहे. त्यांचा प्रचार पाहून मतदारांमध्येही थोडीशी संभ्रमावस्था दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादीला चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन वेगवेगळ्या मतदार संघांत ‘क्रिकेटची बॅट’, ‘घडय़ाळ’ आणि ‘कप-बशी’ या तीन वेगवेगळ्या चिन्हांचा प्रचार करावा लागतो आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात शहरातील विधानसभेच्या तीनही जागा राष्ट्रवादीने पदरात पाडून घेतल्या. प्रत्यक्षात चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादीला उमेदवार देता आले नाहीत. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांना ‘एबी फॉर्म’ दिला नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली, तेव्हा राष्ट्रवादीने कलाटे यांना पुरस्कृत केले. त्यांना ‘बॅट’ चिन्ह मिळाले.

भोसरीत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांना उमेदवारी मिळणार, असे चित्र होते. ऐन वेळी त्यांनी उमेदवारी नाकारली. माजी आमदार विलास लांडे यांनी सुरुवातीपासून अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलीच होती. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्षाचा उमेदवार देण्याऐवजी लांडेंना पुरस्कृत केले. लांडे यांनी ‘कपबशी’ चिन्ह मिळवले.

पिंपरीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे अधिकृत उमेदवार आहे. सुरुवातीला त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नगरसेविका सुलक्षणा धर यांची घोषित उमेदवारी रद्द करून बनसोडे यांचे नाव जाहीर झाले. त्यांना पक्षाचे घडय़ाळ चिन्ह मिळाले.

शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता तीन स्वतंत्र मतदार संघ आणि सीमारेषा लक्षात ठेवणे अडचणीचे आहे. शहरात अनेक ठिकाणी मतदार संघ एकमेकांमध्ये मिसळलेले आहे. उदाहरणार्थ, चिंचवड मतदार संघात काही ठिकाणी नदीचे पात्र ही सीमारेषा आहे. मात्र, चिंचवडगाव अपवाद आहे. गावठाण चिंचवड मतदार संघात आणि चिंचवड नाटय़गृहाच्या अलीकडील भाग पिंपरी मतदार संघात आहे. भोसरी आणि पिंपरी मतदार संघाचा घोळही असाच आहे. मासूळकर कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे भोसरी आणि अलीकडे पिंपरी मतदार संघ आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना तीनही ठिकाणी प्रचार करताना बऱ्यापैकी कसरत करावी लागते आहे.

कुठे गेल्यानंतर कोणत्या चिन्हाचा प्रचार करायचा, हे तपासून घ्यावे लागते आहे. राजकीय सभांमध्ये ‘घडय़ाळाचे काटे बंद करा’, ‘घडय़ाळाचे बारा वाजवा’, अशी टीका होत असली, तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडय़ाळ चिन्ह असणारा उमेदवारच नाही, अशी परिस्थिती आहे.