शिवसेनेचा बंडखोर उमेदवार, काँग्रेसची टक्कर, मनसेला मानणारा मतदार अशी परिस्थिती असतानाही महापौर मुक्ता टिळक यांनी कसब्यातून एकतर्फी वर्चस्व राखले. काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी त्यांना लढत देण्याचा प्रयत्न केला. टिळक यांनी अरविंद शिंदे यांना तब्बल २८ हजार १९६ मतांनी पराभूत केले. मुक्ता टिळक यांच्या दणदणीत विजयामुळे कसब्यात सहाव्यांदा कमळ फुलले. महापौर असतानाच आमदार म्हणून निवडून येत मुक्ता टिळक यांनी नवा इतिहास रचला.
कसब्याचे पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व करणारे गिरीश बापट खासदार झाल्यानंतर कसब्यात बापट यांचा वारसदार कोण, अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. मात्र महापौर मुक्ता टिळक यांना पक्षाने संधी दिली. काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि मुक्ता टिळक यांच्यात सरळ लढत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र जागा न मिळाल्यामुळे शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली होती. त्यातच मनसेनेही शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे लढतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
काँग्रेसला मानणारा वर्ग या मतदारसंघात असला तरी पेठांच्या भागात मुक्ता टिळक यांनाच कौल मिळाला. भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे. भाजपची सर्व यंत्रणा मुक्ता टिळक यांच्या प्रचारात उतरली होती. काँग्रेसला काही भागात मतदान झाले. मात्र मध्यवर्ती भागात टिळक यांनाच पसंती मिळाली. नगरसेवक म्हणून या मतदारसंघातून मुक्ता टिळक तीन वेळा विजयी झाल्या आहेत. नगरसेवक म्हणून केलेली कामे, संयमी व्यक्तिमत्त्व, भाजपचे मतदारसंघातील संघटन याचा फायदा टिळक यांना झाला. शिंदे यांना कमकुवत झालेल्या काँग्रेसचा फटका बसला. त्याउलट टिळक यांना मतदारसंघातील सर्व भागातून मतदान झाल्यामुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. मनसे आणि शिवसेना बंडखोर रिंगणात असल्यामुळे मुक्ता टिळक यांच्या मताधिक्यावर परिणाम होईल, अशी शक्यता होती. मात्र मनसेला अपेक्षित मतेही मिळविता आली नाहीत.
७५,४९२ मुक्ता टिळक- (भाजप)
४७,२९६ अरविंद शिंदे- (काँग्रेस)