सिद्धार्थ शिरोळेंचा निसटता विजय

घराणेशाहीचा आरोप, सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीवरून असलेली नाराजी, काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बहिरट यांनी दिलेली अनपेक्षित लढत अशा परिस्थितीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगरमधून निसटता विजय मिळविला. बहिरट यांनीही काही फेऱ्यात आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत सिद्धार्थ शिरोळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला.

विद्यमान आमदार विजय काळे यांना संधी नाकारत माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र सिद्धार्थ यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले. विद्यमान नगरसेवक असलेले सिद्धार्थ यांच्यासाठी ही पहिलीच मोठी निवडणूक होती. त्यांच्या उमेदवारीवरून भाजपमधील एक गट कमालीचा नाराज होता. ही नाराजी फलकांतूनही वेळोवेळी व्यक्त करण्यात आली होती. काळे यांना उमेदवारी नको म्हणून शिरोळे यांच्यासह एक गट सक्रिय होता. शिरोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुफळी निर्माण झाली. मात्र त्यानंतरही शिरोळे यांनी निसटता विजय मिळवित प्रतिष्ठा जपली.

काँग्रेसकडून दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक सोपी असेल, असे बोलले जात होते. मनसेकडून सुहास निम्हणही निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारसंघ भाजपला मानणारा वर्ग असल्यामुळे तिरंगी लढत असली तरी भाजप उमेदवार सरळ विजयी होईल, अशी शक्यता होती. मात्र बहिरट यांनी ती फोल ठरविली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रित प्रयत्न बहिरट यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. मतदारसंघात काँग्रेसचा एकही नगरसेवक नसतानाही बहिरट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर आणि नात्यागोत्यांच्या जोरावर कडवी लढत दिली. शिरोळे ५ हजार १२४ मतांनी विजयी झाले.

५८,७२७ सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

५३,६०३ दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)

—————————————————

भाजपचे जगताप विजयी

अतिशय नाटय़मय घडामोडींमुळे सुरूवातीपासून लक्ष वेधून घेतलेल्या चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप विजयी झाले. शिवसेनेचे बंडखोर असलेल्या नगरसेवक राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, वंचित आघाडी अशी सर्वाची मोट बांधली. मात्र, ही जुळवाजुळव करूनही त्यांना यश आले नाही.

चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांचे मोठे आव्हान असल्याने त्यांच्या विरोधात लढण्याची कोणाची तयारी नव्हती. राष्ट्रवादीने चिंचवडला उमेदवार दिला नाही. कलाटे यांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी केली, त्यास राष्ट्रवादीने ताकद दिली. त्यानंतर, एकेक करत जगताप विरोधकांचा पािठबा कलाटे यांनी मिळवला. त्यामुळे जगताप यांची एकतर्फी वाटणारी निवडणूक नंतर चुरशीची झाली. कलाटे यांनी आव्हान निर्माण केल्याचे चित्र शेवटच्या टप्प्यात दिसून आले. मात्र, जगतापांच्या ताकदीपुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. जगताप ३८ हजारांनी निवडून आले.

१,५०,७२३ लक्ष्मण जगताप (भाजप)

१ ,१२,२२५ राहुल कलाटे (शिवसेना बंडखोर)

————————————————————————-

आमदार तापकीरांचा संघर्ष

विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी सलग तिसऱ्यांना खडकवासला मतदारसंघातून विजय मिळवून आमदार होण्याची हॅटट्रीक नोंदविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दोडके यांचा त्यांनी पराभव केला. विजयाची हॅटट्रीक केली असली तरी भीमराव तापकीर यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्यामुळे निसटत्या मतांनी तापकीर विजयी झाले.

खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नगरसेवक सचिन दोडके यांना उमेदवारी दिली. मात्र त्यांच्या उमेदवारीवरून नाराज होऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला होता. खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांनी केलेली कामे, तरूण चेहरा, ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व यामुळे दोडके यांनी तापकीर यांना जोराची लढत दिली. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची उत्सुकता कायम राहिली. पहिल्या फेरीपासून तापकीर आणि दोडके यांच्यात विजयासाठी जोरदार संघर्ष होता. काही फेऱ्यांमध्ये दोडके यांनी तर काही फेऱ्यात तापकीर यांनी आघाडी घेतली.

शहरी आणि ग्रामीण अशीच ही लढत झाली. शहरी भागाने तापकीर यांना पसंती दर्शविली. तर ग्रामीण भाग दोडके यांच्या पाठीशी उभा राहिला. या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी केली होती. बंडखोरी मागे घेण्यात आली असली तरी शिवसेनेच्या नाराजीचा फटकाही तापकीर यांना बसला. त्यामुळे त्यांचे मताधिक्य घटले.

त्याउलट काँग्रेस पदाधिकारी सचिन दोडके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरली. वडगांव बुद्रुक, धायरी, नऱ्हे या शहरी भागातून तापकीर यांना मोठे मतदान झाले. त्याचा फायदा तापकीर यांना झाला. तसेच राष्ट्रवादीच्या नाराज गटाची ही तापकीर यांना मदत झाली. त्यामुळे अवघ्या २ हजार ५९५ मतांनी तापकीर विजयी झाले.

१,२०,५१८ भीमराव तापकीर (भाजप)

१,१७,९२३ सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)

————————————————————————

भाजपचे महेश लांडगे यांचा दणदणीत विजय

अतिशय नाटय़मय घडामोडींमुळे जिल्ह्य़ात चर्चेच्या ठरलेल्या भोसरी विधानसभेच्या नात्यागोत्याच्या लढतीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांचा ७७ हजार मतांनी दणदणीत पराभव केला. लांडे यांनी सर्व पक्षांसह लांडगे यांच्यावर नाराज असणाऱ्यांची मोट बांधली. मात्र, तरीही त्या एकत्रित ताकदीचा महेश लांडगे यांच्यापुढे निभाव लागू शकला नाही.

भोसरी विधानसभेच्या आखाडय़ात एकमेकांचे जवळचे नातेवाईक असलेल्या लांडगे आणि लांडे यांच्यातच थेट लढत होती. गेल्यावेळी मोदी लाट असतानाही लांडगे भोसरीतून अपक्ष निवडून आले होते. तेव्हा विलास लांडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. लांडगे या वेळी भाजपचे उमेदवार होते. तर, लांडे यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह न स्वीकारता अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. नाही-हो करत राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत केले. काँग्रेस, मनसेने लांडे यांनाच पािठबा दिला. शिवसेनेची भूमिका सावध होती. सुरवातीला लांडगे एकतर्फी निवडून येतील, असे वातावरण होते. मात्र, लांडे यांच्या विविध खेळ्यांमुळे या निवडणुकीत नंतर चुरस निर्माण झाली. शेवटच्या दोन दिवसांत दोन्हीकडून झालेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे भोसरीचे राजकारण ढवळून निघाले. प्रत्यक्ष निवडणुकीत लांडगे यांनी एकतर्फी विजय मिळवला.

१,५८, ९०८ महेश लांडगे (भाजप)

८१,५२९ विलास लांडे (अपक्ष)

—————————————————————–

शिवसेनेचे चाबुकस्वार पराभूत, राष्ट्रवादीचे बनसोडे विजयी : – 

पिंपरी विधानसभेचे (राखीव) शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी १९ हजार मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये चाबुकस्वारांकडून झालेल्या पराभवाची बनसोडे यांनी या वेळी परतफेड केली. मतदारसंघात संपर्काचा अभाव आणि गेल्या पाच वर्षांतील निष्क्रियतेचा फ4टका चाबुकस्वार यांना बसला.

पिंपरी विधानसभेतून २०१४ मध्ये शिवसेनेचे चाबुकस्वार निवडून आले. त्याआधी ते काँग्रेस पक्षात होते. मोक्याच्या क्षणी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. खासदार श्रीरंग बारणे आणि आझम पानसरे यांची मदत मिळाल्याने चाबुकस्वार तेव्हा निवडून येऊ शकले. मात्र, आमदार म्हणून त्यांच्या कामाच्या मर्यादा लवकरच स्पष्ट झाल्या. भाजपच्या दोन्ही आमदारांच्या तुलनेत ते झाकोळून गेल्याचेही दिसून येत होते. पिंपरी मतदारसंघात त्यांचा संपर्क नव्हता, अशी ओरड सातत्याने होत होती. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असाच सूर शिवसेनेत होता. तथापि, त्यांना डावलून दुसऱ्या कोणाला उमेदवारी देण्याइतके सक्षम नाव पुढे येत नव्हते. अखेर, विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. गेल्या वेळी थोडक्यात पराभूत झालेल्या बनसोडे यांनी यंदा त्या पराभवाची कसर भरून काढली. मतदारसंघातील नाराजीचा फटका चाबुकस्वारांना बसला.

८६,२९६ अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)

६६,६४८ गौतम चाबुकस्वार (शिवसेना)