लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांच्या नियुक्तीचे आदेश येऊन पाच दिवस उलटले, तरी त्यांना पदभार दिला नाही. सरकारमध्ये समावेश झालेल्या एका ‘दादा’ मंत्र्यांच्या तोंडी आदेशामुळे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी खोराटे यांना पदभार दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त एकचा वाद महाराष्ट्र प्रशासकीय लवादमध्ये (मॅट) सुरू असतानाच आता अतिरिक्त आयुक्त दोनचाही वाद सुरू होते की काय, अशी चर्चा प्रशासकीय वतुर्ळात सुरू झाली आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारांसाठी शोधाशोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांची राज्य शासनाने ६ जुलै रोजी बदली केली. त्यांच्या सेवा महसूल आणि वन विभागाकडे वर्ग केल्या. शिंदे गटाच्या खासदाराच्या सांगण्यावरून ही बदली झाल्याचे सांगण्यात आले. वाघ यांच्या जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून विजयकुमार खोराटे यांच्या नियुक्तीचे आदेश झाले. शासनाचा आदेश घेऊन खोराटे हे तातडीने शुक्रवारी महापालिकेत दाखल होत रुजू झाले. रुजू अहवाल आयुक्तांना पाठविला. खोराटे हे अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात जावून बसले. त्यांनी महापालिकेच्या ई-मेल वरुन पालिकेत रुजू झाल्याचे शासनाला कळविले. दालनावर पाटी देखील लावण्यात आली. मात्र, मुदतपूर्व बदली झाल्याने वाघ यांनी सूत्रे हलवली आणि नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एका मंत्र्यांचा आयुक्त सिंह यांना दूरध्वनी आला. त्यांनी वाघ यांची मुदतपूर्व बदली झाली असून नवीन आलेल्या अतिरिक्त आयुक्त खोराटे यांना रुजू करून घेऊ नका, असे तोंडी आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आयुक्तांनी खोराटे यांच्या रुजू अहवालावर स्वाक्षरी केली नाही.

आणखी वाचा-पिंपरी: सनदी लेखापालाने मैत्रिणीमार्फत रचलेला भागीदाराच्या खुनाचा कट ‘असा’ झाला उघड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोमवारी महापालिकेत आलेले खोराटे हे मंगळवारी दिवसभर फिरकले नाहीत. शिंदे गटाच्या खासदाराने केलेली बदली रोखण्यासाठी नवीन मंत्री प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यातील दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे.