कोपर्डी घटनेनंतर ..

कोपर्डी घटनेबद्दल मराठा समाजामध्ये असंतोष पसरला आहे. ती अस्वस्थता विविध ठिकाणी मोच्रे काढून व्यक्त होत आहे. सगळ्या मोर्चामध्ये कोणताही राजकीय पक्ष किंवा संघटना नाही. सगळा मराठा वर्ग एकवटला आहे. परंतु काही नेते मोच्रे दलित समाजाविरोधातील आहेत, असे चित्र रंगवित आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जाचक तरतुदी रद्द करून कायद्यात सुधारणा व्हावी आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी व्हावी, हीच मराठा समाजाची मागणी आहे. त्यामुळे कोपर्डी घटनेबद्दल होणाऱ्या मोर्चाविषयीच्या चुकीच्या चच्रेमधून मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबद्दल सरकारने अभ्यास करून केंद्राला शिफारस पाठवून जाचक अटी कमी कराव्यात. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत नोंदविलेल्या ९५ टक्के खटल्यांमध्ये बहुतांश जणांची निर्दोष सुटका होते. कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करता न येण्याची जाचक तरतूद आहे. ती तरतूद चुकीची असून शहानिशा केल्याशिवाय गुन्हे दाखल करणे देखील चुकीचे आहे. अ‍ॅट्रॉसिटीबाबत २०१० ते २०१६ या कालावधीत घडलेल्या घटनांचा अभ्यास करून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन सुधारणा करण्याचे काम शिवसंग्राम करेल. तसेच कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्नही आम्ही करणार आहोत. दलितांच्या विरोधात आम्ही नाही. त्यामुळे मोच्रेकऱ्यांचे म्हणणे, त्यांचा असंतोष समजून घेत सरकारने लक्ष द्यायला हवे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अभ्यास करून सुधारणा कराव्यात.  मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळास भरीव आíथक तरतूद करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

महापालिका निवडणूक शिवसंग्राम लढविणार

आगामी पुणे महापालिका निवडणूक शिवसंग्राम लढविणार आहे. मात्र, महायुतीमध्ये सहभागी व्हायचे की स्वतंत्रपणे लढायचे याबाबत निर्णय झालेला नाही, असेही मेटे यांनी सांगितले. ते म्हणाले, मला मंत्रिपद मिळाले नाही याबाबत नाराज आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत चालढकल केल्यास युतीतून बाहेर पडण्याचा विचार करावा लागेल. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्याचा प्रयत्न असून कामाला गती देणार आहे.