महिलांवरील अत्याचारासंदर्भात गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून, बलात्काराच्या गुन्ह्य़ांबरोबरच विनयभंग, छेडछाड, अपहरण आदी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. विशेष म्हणजे बलात्काराच्या एकूण गुन्ह्य़ांपैकी ७० टक्के गुन्हे हे संबंधित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून करण्यात आले असल्याचे दिसून येते. ‘सोशल नेटवकिंग साईट्स’ च्या माध्यमातूनही महिलांबाबतच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ होत आहे.
मागील वर्षी दिल्लीत तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात मोठे आंदोलन झाले. पुण्यातही त्या वेळी आंदोलन झाले. महिलांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण होऊन महिलांवरील अत्याचाराबाबतचे गुन्हे कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शहरात दाखल होणारे गुन्हे लक्षात घेता महिला अत्याचाराबाबतचे गुन्हे वाढले असल्याचे दिसून येते. पुणे शहरात २०१२ मध्ये बलात्काराच्या ७० घटना घडल्या होत्या. तर २०१३ मध्ये त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन ही संख्या १३५ वर गेली आहे. बलात्काराच्या सत्तर टक्के घटना या लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या आहेत. विनयभंगाच्या घटनांमध्ये तर तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हुंडय़ासाठी छळ, हुंडाबळी, पती किंवा नातेवाइकांकडून छळ या घटनांत वाढ होत आहे. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंग साईट्स, व्हॉट्स अॅपवरून महिलांविरुद्ध गुन्हय़ांत वाढ होऊ लागली आहे.
—— आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाणही मोठे
महिलांविषयीच्या गुन्हय़ांत वाढ होत असताना या गुन्हय़ातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे आढळून आले आहे. या गुन्हय़ांत आरोपींना शिक्षा होण्यासाठी पीडित मुलगी, तिचे आई-वडील आणि पोलीस यंत्रणांनी शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. मात्र, बहुतांश गुन्हय़ांत पीडित मुलगी किंवा महिला शेवटपर्यंत ठाम राहात नाहीत. त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे आरोपी निर्दोष सुटतात. शासनाने आता महिलांच्या संदर्भात खटले चालविण्यासाठी स्वतंत्र न्यायालये सुरू केली आहेत. त्याचा निश्चित फायदा होईल, असे एका महिला वकिलाने सांगितले.
महिलांविरुद्धचे दाखल गुन्हे
गुन्हय़ाचा प्रकार—२०१२—२०१३
हुंडय़ासाठी खून—-०८—-०८
खुनाचा प्रयत्न—–१३—-१०
बलात्कार——–७०—-१३५
अपहरण——–४६—–७१
नातलगांकडून छळ–१८०—३२९
विनयभंग——-१०४—-२९७
छेडछाड ——-५७—–९५