पुणे : शहराचा ऐतिहासिक वारसा असलेला विश्रामबागवाडा जुलैअखेरपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून विश्रामबागवाडा दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. विश्रामबाग वाड्याचे जतन व संवर्धानाचे काम गेली दोन वर्षे महापालिकेच्या हेरिटेज सेलच्या माध्यमातून सुरू आहे. या कामाला विलंब होत असल्याने, काम पूर्ण न केल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हे काम तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन केले.
‘विश्रामबागवाड्याचा दर्शनी भाग खराब झाला होता, त्याला मूळ स्वरूपात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू होते. यामध्ये महापालिकेला यश आले असून, जुलैअखेर वाड्याचा दर्शनी भाग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल,’ असे आश्वासन हेरिटेज सेलचे उपअभियंता सुनील मोहिते यांनी दिल्याचे खर्डेकर यांनी सांगितले. ‘हे काम अत्यंत नाजूक होते. लाकडी महिरप आणि सज्जा त्याच स्वरूपात पुन्हा उभारण्याचे काम अवघड होते. त्यावर मेहनत घेतल्यामुळे त्याचे मूळ स्वरूपात संवर्धन करणे शक्य झाले आहे. या कामाला विलंब लागला,’ असे मोहिते यांनी स्पष्ट केले.
विश्रामबाग वाड्यातील दालन क्रमांक एक व दोनचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. ते पर्यटकांसाठी खुलेही करण्यात आले आहे. मात्र, मुख्य दर्शनी भाग जुलैअखेर सुरू केला जाणार आहे.- सुनील मोहिते, उपअभियंता, हेरिटेज सेल