पुणे : पुणे शहरातील एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे येथील हॉटेल मालकाने वेटरचा पगार न दिल्याने, वेटरने मालकाचा चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी वेटरला अटक केली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संतोष शेट्टी (वय 44) असे खून झालेल्या हाॅटेल मालकाचे नाव आहे. तर उमेश दिलीप गिरी (वय 39) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए रोडवर संतोष शेट्टी यांचे पिकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट आहे. आरोपी उमेश गिरी हा काही महिन्यापासून त्यांच्या हॉटेलमध्ये काम करीत होता. संतोष शेट्टी यांनी उमेश गिरी याचा पगार न दिल्याने मंगळवारी रात्री च्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी आरोपी उमेश गिरीने भटारखान्यातील चाकूने संतोष शेट्टी यांच्यावर सपासप वार केले.
या घटनेत संतोष शेट्टी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.तसेच या प्रकरणातील आरोपी उमेश गिरी याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे उत्तमनगर पोलिसांनी सांगितले.