राज्यात तरुणी आणि महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मात्र, सरकार याबाबत काही करताना दिसत नाही. उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. भाजपाच्यावतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, आजी माजी आमदार पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उत्तर प्रदेशातील तरुणीबाबत घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो. यातील आरोपींना पकडण्यात आले असून त्यांना कडक शिक्षा दिली जाणार असल्याचे, तेथील सरकारने जाहीर केले. मात्र, आपल्या राज्यात देखील अशा घटना घडत आहेत. त्याबद्दल मोर्चे किंवा कँडल मार्च का काढले जात नाहीत? असा माझा प्रश्न आहे.”
आपल्या राज्यात लहान मुली, गतीमंद मुली, कोविड सेंटरमधील तरुणी आणि महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कोणत्याही प्रकाराची कारवाई होताना दिसत नाही. या सर्व घटनांचा आम्ही निषेध करतो. पण एवढ्या घटना होऊन देखील राज्य सरकार, याकडे लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत अनेक वेळा निवेदन दिली. त्यावर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले जात नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करीत आहोत. तसेच या आंदोलनाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र लढा उभारला जाणार असल्याचा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
तुमचा गुलाबरावांवर विश्वास पण नाथाभाऊंवर नाही : चंद्रकांत पाटील</strong>
एकनाथ खडसे यांचे पक्षांतर निश्चित आहे, असं शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतचं म्हटलं आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी वारंवार सांगितले आहे की ज्या पक्षात मी वाढलो, मोठा झालो त्या पक्षाचे नुकसान मी करणार नाही. मात्र, तरीही तुमचा गुलाबरावांवर विश्वास आहे, आमच्या नाथाभाऊंवर नाही.
