चंदन हायगुंडे
तब्बल १५ वर्षांपासून फरार असताना, पुण्यातून नुकतेच अटक करण्यात आलेला संशयित नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ लॅपटॉप (४४) हा १० मार्च २०१८ रोजी युट्यूबवर पोस्ट झालेल्या ‘उलगुलान – एव्हरीडे हिरो’ नावाच्या एका लघुपटात दिसला. मात्र तीन मिनिटांच्या या लघुपटात त्याचे नाव “सुनील जगताप सर” असे नमूद असून, तो खालापूर (रायगड जिल्हा) येथल आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
लघुपटात तो स्वतःच्या कामाची माहिती सांगताना दिसत आहे आहे. स्थानिक शिक्षक व विद्यार्थी त्याची प्रशंसा करताना दाखविले आहेत. हा लघुपट सात वर्ष इंटरनेटवर असूनही तपास यंत्रणांना त्याबद्दल समजले नाही. साल २०११ मध्ये दाखल नक्षलवादाच्या गुन्ह्यात अखेर ४ मे २०२५ रोजी त्याला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.
त्याने सुनील जगताप नावाने खालापूरच्या पत्त्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट देखील मिळविल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.खालापूरमध्ये आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक काम आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना तो याच नावाने सर्वत्र वावरत होता. परंतु माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता मिलिंद तेलतुंबडे यांच्या आदेशानुसार तो वेळोवेळी जंगलात व शहरी भागात फिरून नक्षलवादी संघटनेचे काम करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तेलतुंबडे नोव्हेंबर २०२१ मध्ये गडचिरोलीत पोलीस चकमकीत मारला गेला.
तो २०२१ मध्ये गाजलेल्या शेतकरी आंदोलनातही सहभागी झाला होता व नेपाळसह भारतातील विविध राज्यात फिरायचा, असे पोलिसांनी मुंबई सेशन कोर्टात सांगितले आहे. कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत १९ मे पर्यंत वाढ केली आहे.
अटक होण्यापूर्वी तो सध्या खालापूर येथील डोनवत गावात राहण्यास होता. येथे त्याने दुकान भाड्याने घेतले होते, जेथे तो सीसीटीव्ही लावणे, संगणक आणि लॅपटॉप दुरीस्तीचे काम करायचा. दुकान भाड्याने घेताना त्यांना जे आधार कार्ड वापरले ते ‘इंडियन एक्सप्रेस’ला प्राप्त झाले असून त्यावर त्याचे नाव “सुनील रामचंद्र जगताप” आणि पत्ता खानव गाव, खालापूर असा आहे. त्याने बनावट नावाने आधार कार्ड, पासपोर्ट आणि अन्य कागदपत्र कसे बनविले, त्याची बँक खाती, आर्थिक व्हायव्हर याचा सखोल तपास सुरु आहे.
दरम्यान त्याला सुनील जगताप नावाने ओळखणाऱ्या खालापूर येथील ग्रामस्थांना त्याच्या अटकेमुळे मोठा धक्का बसला आहे. त्याचे या भागातील सामाजिक काम आणि सर्वांसोबत चांगले वागणे बोलणे असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही,
महाराष्ट्राच्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील म्हणाले की खोट्या नावाने वावरणे माओवाद्यांची “मोडस ऑपरेंडी” आहे. पाटील म्हणाले, “कांबळे एक जहाल माओवादी आहे. त्याने सरकारच्या योजनेअंतर्गत आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. तो मिलिंद तेलतुंबडेच्या सूचनेनुसार काम करत होता आणि गडचिरोलीतील जंगलात कोरची कुरखेडा दलम आणि शहरी भागातही सक्रिय होता.”
माओवाद्यांच्या योजनेनुसार पश्चिम घाटात त्यांचे काम वाढविण्यासाठी कांबळे जाणीवपूर्वक खोटे नाव धारण करून खालापूर भागात राहत होता का याबाबत पोलीस तपास सुरु आहे.