scorecardresearch

प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्य़ातील १२ नगरपालिकांचा समावेश

पुणे : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारा नगरपालिकांचा समावेश आहे. बारामती, शिरूर, दौंड, लोणावळय़ासह इतर नगरपालिकांची निवडणूक होणार असून जिल्ह्यातील नेते मंडळींनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आडाखे बांधायला सुरुवात केली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

करोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध, राज्यातील राजकीय स्थिती आणि इतर मागासवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा पेच अशा विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास चालढकल केली जात होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या किंवा मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये निवडणूक प्रभागाच्या सीमांची प्रसिद्धी, हरकती व सूचना मागवणे, प्राप्त हरकतींवर सुनावणी आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. आयोगाने यंदा अ, ब, आणि क वर्ग नगरपालिकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला आहे.

दरम्यान, मे २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील बारामती, शिरूर, दौंड, लोणावळा, चाकण, राजगुरूनगर, जेजुरी, आळंदी, सासवड, तळेगाव दाभाडे, जुन्नर आणि इंदापूर या नगरपालिकांची मुदत संपत आहे. सात नगरपालिकांची मुदत चालू महिन्यातच संपली आहे, तर तळेगाव दाभाडे, लोणावळा आणि जुन्नर नगरपालिकांची मुदत जानेवारी महिन्यात संपली. चाकण नगरपालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये, तर राजगुरूनगर नगरपालिकेची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. सध्या चाकण आणि राजगुरूनगर येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभाग रचनेचा कार्यक्रम

नगरपालिकांसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे २ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. यामध्ये प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन व नकाशा यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी ७ मार्चपर्यंत प्रभागरचनेला मान्यता देतील. प्रारूप प्रभागरचना, प्रभागनिहाय नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. प्रभागरचनेवर १० ते १७ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत. २२ मार्च रोजी जिल्हाधिकारी हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर २५ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी हरकती आणि सूचनांचा अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवतील. नगरपालिकांच्या अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम  राज्य निवडणूक आयोग १ एप्रिलपर्यंत जाहीर करणार आहे. त्यानंतर प्रभागरचना जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिका कार्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ward formation program announced includes municipalities district ysh

ताज्या बातम्या